टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला बहुमत, १११ जागा मिळण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 10:49 PM2017-12-06T22:49:00+5:302017-12-06T22:51:11+5:30
आज प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेमध्ये मात्र गुजरातमध्ये भाजपा दणदणीत विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान आता काही दिवसांवर आले आहे. गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसण्याचा अंदाज राजकीय गोटातून वर्तवण्यात येत आहे. राहुल गांधी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्या झंझावाती सभांमुळे भाजपाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. पण आज प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेमध्ये मात्र गुजरातमध्ये भाजपा दणदणीत विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इतर सर्व्हेंप्रमाणेच टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने घेतलेल्या या सर्व्हेमध्येही भाजपाच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेमध्ये गुजरातमध्ये भाजपाला ४५ टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मते मिळतील असे भाकीत करण्यात आले आहे. तर इतर पक्षांच्या झोळीत १५ टक्के मते जातील.
मिळणाऱ्या मतांचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला १११, काँग्रेसला ६८ तर इतरांना तीन जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हटले आहे. गुजरातमधील विविध भागात जीएसटी तसेच पाटिदारांचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न यामुळे भाजपाच्या मतांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र भाजपाला गाठणे काँग्रेसला शक्य होणार नसल्याचे सर्व्हेत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे, असे निरीक्षण या सर्व्हेत नोंदवण्यात आले होते.