राज्यसभेत भाजपला कामचलाऊ बहुमत, मित्रांखेरीज अन्यांचीही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:22 AM2019-06-25T04:22:58+5:302019-06-25T04:24:06+5:30

तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत.

Majority for BJP in the Rajya Sabha | राज्यसभेत भाजपला कामचलाऊ बहुमत, मित्रांखेरीज अन्यांचीही मदत

राज्यसभेत भाजपला कामचलाऊ बहुमत, मित्रांखेरीज अन्यांचीही मदत

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली  -  तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत.

तेलगू देसमच्या चार खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची राज्यसभेतील सदस्यसंख्या ७५ झाली आहे. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ सदस्यांचा (जद (यू) चे ६, शिवसेना व अकाली दलाचे प्रत्येकी ३, आगप, बीपीएफ, एनपीएफ, रिपब्लिकन व एसडीएफ यांचे प्रत्येकी १ मिळून १७. शिवाय तीन राष्ट्रपतीनियुक्त व चार अपक्ष खासदार) पाठिंबा आहे. अण्णा द्रमुकचे १३ सदस्यही सरकारच्या पाठिशी असल्याने संख्या होते ११२. राज्यसभेची सदस्यसंख्या २३६ असली तरी ९ जागा रिकाम्या असल्याने प्रत्यक्ष सदस्य आहेत २२५.

बिजू जनता दलही (५ सदस्य) भाजपला मदत करतो व वायएसआर काँग्रेसचा (२) पाठिंबा मिळू शकतो. ज्या ९ जागांच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्यापैकी ५ जागा भाजप व मित्रपक्षांना मिळतील. परिणामी भाजप, मित्रपक्ष व अन्य मदत करणारे पक्ष यांची संख्या १२४ होईल. मग तेलंगणा राष्ट्र समितीने (६) पाठिंबा दिला नाही, तरीही भाजपचे अडणार नाही.

तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला मात्र जद (यू), टीआरएस व वायएसआर काँग्रेस यांचा आक्षेप आहे. ते विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, याची खात्री नाही. पण विरोधाऐवजी हे पक्ष मतदानात सहभागी न होण्याची शक्यता आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसचे १३ पैकी काही राज्यसभा सदस्य फुटण्याची चर्चा आहे. जनता दल (एस) चा एकच सदस्य असून, तोही प्रसंगी सरकारच्या मदतीला येऊ शकतो.

पुढील वर्षी स्पष्ट बहुमत

याप्रकारे भाजप व रालोआकडे स्पष्ट बहुमत नसले तरी अन्यांच्या मदतीने सरकारला राज्यसभेतील कामकाज चालवण्यासाठी कामचलाऊ बहुमत आताच मिळाले आहे.
अर्थात पुढील वर्षी राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचा समावेश असून, त्यामुळे त्या निवडणुकीनंतर भाजपला राज्यसभेत स्पष्ट बहुमत मिळू शकेल.

Web Title: Majority for BJP in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.