पाच राज्यांच्या निकालानंतरही राज्यसभेत विरोधकांचेच बहुमत

By admin | Published: January 10, 2017 01:30 AM2017-01-10T01:30:33+5:302017-01-10T01:30:33+5:30

पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी राजकारणाचे भवितव्य या निकालांमुळे ठरेल, असे बोलले जाते. प्रत्यक्षात पाच राज्यांचे निकाल

The majority of opponents in the Rajya Sabha even after the results of five states | पाच राज्यांच्या निकालानंतरही राज्यसभेत विरोधकांचेच बहुमत

पाच राज्यांच्या निकालानंतरही राज्यसभेत विरोधकांचेच बहुमत

Next

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी राजकारणाचे भवितव्य या निकालांमुळे ठरेल, असे बोलले जाते. प्रत्यक्षात पाच राज्यांचे निकाल काहीही लागले, तरी राज्यसभेत पुढले सव्वा वर्ष विरोधकांचे बहुमत कायम राहील. राजकीय समीकरणे बदलत नसल्याने, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला संघर्ष अथे वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत अवघे १0 सदस्य यंदा म्हणजे २0१७ मधे निवृत्त होत आहेत. त्यात पश्चिम बंगालचे ६, गुजराथचे ३ आणि गोव्याचा १ अशी वर्गवारी आहे. यापैकी एकमेव गोवा वगळता, उर्वरित ९ जागांवर भाजपाचे संख्याबळ वाढण्याची शक्यता नाही. गोव्याच्या जागेचे भवितव्यदेखील भाजपाला या राज्यात बहुमत मिळते की नाही, त्यावर अवलंबून आहे.
पश्चिम बंगालच्या ६ पैकी ५ जागा सध्या तृणमूलकडे आहेत. विधानसभेत तृणमूलचे संख्याबळ लक्षात घेता, या जागा कायम राखण्याबरोबर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागाही तृणमूलच्याच पदरात पडेल. याखेरीज ६ व्या जागेवर माकपचे सीताराम येचुरी निवृत्त होत आहेत. काँग्रेसच्या सहकार्याने डावे पक्ष ही जागा सहज मिळवू शकतील. याचा अर्थ, बंगालच्या सर्व जागा विरोधकांकडेच राहणार आहेत. गुजरातच्या ३ जागांमध्ये भाजपाकडे २ तर काँग्रेसकडे १ जागा आहे. या ३ जागांमधे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व काँग्रेसच्या अहमद पटेलांचा समावेश आहे. गुजरात विधानसभेच्या संख्याबळानुसार उभय पक्षांच्या जागा कायम राहणार असल्याने, भाजपाच्या संख्येत इथेही वाढ होण्याची चिन्हे नाहीत. निवृत्त होणाऱ्या १0 सदस्यांमध्ये एकमात्र जागा गोव्याची आहे. गोव्यात लवकरच विधानसभेची निवडणूक आहे. ११ मार्च रोजी त्याचा निकाल आहे. यानंतर, बहुमताचे संख्याबळ ज्या पक्षाकडे असेल, त्या पक्षालाच या जागेचा लाभ होईल.

संख्याबळ कितीतरी अधिक


- राज्यसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून, सभागृहात त्याचे ६0 सदस्य आहेत. भाजपाचे ५५ सदस्य आहेत.

 - तथापि तृणमूल, डावे पक्ष, द्रमुक, समाजवादी, बसप, राजद, जनता दल (यु), जनता दल (एस) व काही छोटे पक्ष आणि अपक्ष भाजपाच्या कडवट विरोधात  असल्याने विरोधकांचे संख्याबळ इथे कितीतरी अधिक आहे.

 - विधानसभेची निवडणूक ज्या पाच राज्यांत आहे, त्यापैकी उत्तर प्रदेशच्या ३१ पैकी १0 जागांचे सदस्य पुढल्या वर्षी म्हणजे, एप्रिल २0१८ मधे आणि पंजाबच्या सर्व ७ जागांचे सदस्य २0२२ मधे निवृत्त होत आहेत.
- उत्तर प्रदेशात पुढल्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सपाचे ६ सदस्य आहेत. त्यात नरेश अग्रवाल, जया बच्चन, किरणमय नंदा, आलोक तिवारी, दर्शनसिंग यादव व चौधरी मुनव्वरसिंग यांचा समावेश आहे.
- बसपच्या दोन जागांपैकी एक स्वत: मायावतींकडे, तर दुसरी मुनकाद अलींची आहे. याखेरीज काँग्रेसचे प्रमोद तिवारी आणि भाजपाचे विनय कटियार असे आणखी दोन सदस्य आहेत.

 - पुढल्या वर्षी या १0 जागांवर नवे सदस्य निवडून येतील. त्यात भाजपाला किती जागा मिळतील, हे निकालावर ठरेल.
लोकसभेचा निवडणुकीपूर्वी पंजाबची एकही जागा रिक्त होणार नसल्याने, तिथे कोणताही बदल संभवत नाही. उत्तराखंडात पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात ज्या ३ जागा रिक्त होत आहेत, त्यापैकी एक जागा काँग्रेसची आहे.
-  मणिपूरची एकमेव जागा चार वर्षांनी रिक्त होईल. थोडक्यात, सदस्यांच्या निवृत्तीमुळे ५ राज्यांच्या ४३ पैकी अवघ्या १२ जागा पुढल्या वर्षात म्हणजे, एप्रिल २0१८ मध्ये रिक्त होतील. संख्याबळाची ही आकडेवारी लक्षात घेता, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला तीव्र संघर्ष सव्वा वर्ष तरी संपणार नाही.

Web Title: The majority of opponents in the Rajya Sabha even after the results of five states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.