विजय मल्ल्याच्या जेटचा लिलाव जलदगतीने करा
By admin | Published: October 15, 2016 04:50 AM2016-10-15T04:50:13+5:302016-10-15T04:50:13+5:30
विजय मल्ल्याच्या खासगी जेटची लिलाव प्रक्रिया व विक्री १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सेवाकर
मुंबई : विजय मल्ल्याच्या खासगी जेटची लिलाव प्रक्रिया व विक्री १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सेवाकर विभागाला दिले.
सेवाकर विभागाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी विजय मल्ल्याचे खासगी जेट मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आलेले आहे. मल्ल्याच्या खासगी जेटची लिलाव प्रक्रिया व विक्री १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांनी सेवाकर विभागाला दिले.
‘गेले कित्येक महिने जेटचा विमानतळावर मुक्काम आहे आणि तुम्ही (सेवाकर विभाग) केवळ मुदत मागत आहात. लिलाव प्रक्रिया लवकर पार पाडा. जेणेकरून विमानतळावरील जागा रिकामी होईल. आम्हाला आशा आहे की, विमानाची लिलाव प्रक्रिया आणि विक्री १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,’ असे खंडपीठाने म्हटले.
मल्ल्याच्या खासगी जेटचा लिलाव रद्द करावा, यासाठी सेवाकर विभागाने उच्च न्यायालयात धाव घेतली. जेटची सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीने जेटच्या एकूण किमतीच्या ८० टक्केच बोली लावल्याचा आरोप सेवाकर विभागाने केला आहे. मल्ल्याच्या खासगी जेटमध्ये कॉन्फरन्स हॉल, मीटिंग रूम आणि अन्य सोयीसुविधा आहेत. (प्रतिनिधी)