सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:00 AM2021-07-11T06:00:57+5:302021-07-11T06:03:40+5:30
Amit Shah : सहकार क्षेत्रातील दिग्गजांची शाह यांनी घेतली भेट. सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील असल्याचं वक्तव्य.
नवी दिल्ली : सहकार क्षेत्र आणि सर्व सहकारी संस्था यांना अधिक सक्षम बनविण्याचा निर्धार सरकारने केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले आहे. देशाच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची शाह यांनी शनिवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून नव्याने निर्माण केलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे सोपविल्यानंतर तिसऱ्याच दिवशी शाह यांनी सहकार क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेतली आहे. शाह यांना भेटणाऱ्यांत नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे चेअरमन दिलीप संघानी, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे (इफको) चेअरमन बी. एस. नकाई, इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी आणि नाफेडचे चेअरमन बिजेंदरसिंग यांचा समावेश आहे. शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सहकार क्षेत्र आणि सर्व सहकारी संस्थांना सक्षम बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील
शाह यांनी अद्याप नवनिर्मित सहकार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. मात्र, त्याआधीच त्यांनी सहकार क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बैठकीत शाह यांनी सांगितले की, इफको आणि कृभको यांसारख्या सहकारी संस्थांनी बियाणे उत्पादन आणि सेंद्रिय शेती या क्षेत्रात काम करावे.
पडीक असलेल्या ३८ हजार हेक्टर जमिनीचा वापर त्यांनी त्यासाठी करावा. देशातील सहकार चळवळीला मजबूत करण्यास सरकार बांधील आहे. शेतकरी उत्पादन संस्थांना (एफपीओ) देण्यात येणाऱ्या सवलती व लाभ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना देण्यात येईल.