सुखोई अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा
By admin | Published: July 8, 2017 01:01 AM2017-07-08T01:01:56+5:302017-07-08T01:01:56+5:30
भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
तिरुअनंतपुरम : भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, आपल्या मुलाच्या मृत्यूविषयी त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
फ्लाइट लेफ्टनंट अचुदेव आणि स्क्वॉड्रन लीडर डी. पंकज असलेल्या सुखोई विमानाला २३ मे रोजी भारत-चीन सीमेवर अपघात झाला होता. तीन दिवसांनंतर विमानाचे अवशेष आढळून आले. त्यानंतर दोन्ही शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, आपल्या घरी आलेल्या शवपेटीत त्यांच्या मुलाचे पार्थिव नव्हते. असा संशय व्यक्त केला आहे.
दुर्घटनेत होरपळल्याने अचुदेव यांची ओळख करणे कठीण होते. त्यांच्या पार्थिवापाशी सैन्याला जे पाकीट मिळाले त्याआधारे अचुदेव यांची ओळख पटवण्यात आली, असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र माझ्या मुलाची ओळख पटवणे अशक्य असेल, तर त्याच्या पाकिटातील रोख रक्कम व बँक कार्ड कसे व्यवस्थित राहिले, असा प्रश्न अचुदेवच्या वडिलांनी केला आहे.
मृत्यूची सांगण्यात आलेली कारणे आणि देण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये तफावत आहे. या घटनेमागे कोणती तरी दुसरीच गोष्ट दिसत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)
कधी कोसळले?
वायुसेनेने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान व वायुसेनेच्या प्रमुखांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बेपत्ता सुखोई एसयू ३0 जेट फायटरला २३ मे रोजी अपघात झाला होता. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले होते. हे विमान चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून आसाममधून बेपत्ता झाले होते. नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले होते.