दिवाळीच्या बाजारावर 'मेक इन इंडिया'चा प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:46 PM2019-10-23T12:46:48+5:302019-10-23T12:49:36+5:30
दिल्लीतील दिवाळीच्या बाजारावर 'मेक इन इंडिया'चा प्रभाव वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतीलदिवाळीच्या बाजारावर 'मेक इन इंडिया'चा प्रभाव वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व गाजवणाऱ्या चिनी बनावटीच्या मूर्ती हद्दपार झाल्या आहेत. दिवाळीनिमित्त बाजारात विविध देवदेवतांच्या मूर्ति विक्रीसाठी दाखल होत आहेत.
दिल्लीतील बाजारामध्ये तीन दशकांहून अधिक काळ दुकान चालवणारे व्यावसायिक सुरेंद्र बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती बाजारातून मेड इन चायनाच्या मूर्ती हद्दपार झाल्या आहेत. चीनवरून आयात केलेल्या मूर्तीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाणही अतिशय कमी आहे. व्यापाऱ्यांनी चीनवरून यंदा खूप कमी मूर्ती आयात केल्या आहेत. मूर्तीची कलाकुसर, रंग याबबात दर्जा सुधारल्याने भारतीय मूर्तीकारांनी चीनला पिछाडीवर टाकण्यात यश मिळवले आहे.
अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे अभियान चालवले जात आहे. या अभियानामुळे भारतीय मूर्तींना मागणी वाढवल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे असे दिल्ली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवराज बावेजा यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या विविध भागात मसलन बराडी, पंखा रोड, गाजीपूर, सुल्तानपुरी, जुनी दिल्ली येथे तयार केलेल्या सुंदर मूर्तींची विक्री केली जात आहे.
यंदा देशी मूर्तींच्या किंमती या गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. आकार, सुबकतेनुसार बाजारात 100 ते 8 हजार रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. दिवाळीत प्रामुख्याने लक्ष्मी, गणपती, हनुमान. दुर्गा, सरस्वती यांच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मेरठमध्ये मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार केल्या जातात. मेरठच्या मूर्ती दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. चीनवरून आयात करण्यात आलेल्या मूर्ती 30 ते 40 टक्के महाग आहेत. त्यामुळेच व्यापारीही देशी मूर्तीच्या विक्रीलाच प्राधान्य देत आहेत.
चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या अभियानामुळेच बाजारात भारतीय मूर्तींचे प्रमाण वाढले आहे. व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांचाही यात मोलाचा वाटा आहे. ग्राहक जागृत झाले असून त्यांच्याकडून चिनी बनावटीच्या वस्तूंची खरेदी टाळली जात असल्याने देशी मूर्तींना मागणी वाढली आहे.
- प्रवीण खंडेलवाल, महासचिव, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)