मेक इन इंडिया म्हणजे भिक्षापात्र नव्हे: मोदी
By admin | Published: March 4, 2016 03:46 AM2016-03-04T03:46:56+5:302016-03-04T03:46:56+5:30
आमचे सरकार जणू भिक्षापात्र हातात घेऊन निघाले आहे, अशा प्रकारे देशाची प्रतिमा जगभर करण्याचे काम विरोधी बाकांवरील मंडळी करीत आहेत व मेक इन इंडियाची खिल्ली उडवत आहेत. अशा मंडळींविषयी मी काय बोलणार
नवी दिल्ली : आमचे सरकार जणू भिक्षापात्र हातात घेऊन निघाले आहे, अशा प्रकारे देशाची प्रतिमा जगभर करण्याचे काम विरोधी बाकांवरील मंडळी करीत आहेत व मेक इन इंडियाची खिल्ली उडवत आहेत. अशा मंडळींविषयी मी काय बोलणार, काहींची बुद्धीच मंद असते. वय वाढले तरी त्यांची समज वाढतच नाही, त्यांना काही गोष्टी उशिराच समजतात, त्यांच्याविषयी काय बोलणार, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांवर लोकसभेत प्रतिहल्ला चढविला. गुरुवारी ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते.
डॉ. मनमोहन सिंग अमेरिकेत राष्ट्रपती ओबामांशी चर्चा करीत असताना, भारतात एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आपल्याच सरकारच्या वटहुकुमाची प्रत फाडली होती, याचा उल्लेखही मोदी यांनी केला. विरोधी बाकांवर काँग्रेसचे सदस्य उपस्थित असल्याने पंतप्रधानांच्या टीकेचा विखार अधिकच प्रखर झाल्याचे लोकसभेत पुन्हा एकवार पाहायला मिळाले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी दोघांना भरपूर कोपरखळ्या मारल्या आणि चिमटेही काढले.
संसदेच्या कामकाजाचा स्तर
इतका घसरला, की खासदारांनी प्रश्न विचारले तरी अलीकडे अधिकारी घाबरत नाहीत, असे नमूद करीत पंतप्रधान म्हणाले, संसदेमध्ये सरकार व प्रशासनाला कामकाजाचा जिथे जाब विचारता येतो तिथे दुर्दैवाने प्रशासनाचे व अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व आपणच संपवीत चाललो आहोत. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमधली भांडणे पाहून अधिकारी खूश आहेत. अलीकडे एकमेकांना टाळ्या देत ते हसतात. (विशेष प्रतिनिधी)
> पंतप्रधानांनी काढले काँग्रेस सदस्यांना चिमटे
‘सभागृहाचे कामकाज सुरळीत चालले नाही, तर सत्ताधारी पक्षाचे फारसे नुकसान होत नाही. देशाचे मात्र होते, अधिक नुकसान विरोधी सदस्यांचे होते, कारण सरकारला जाब विचारण्याची संधीच विरोधकांना मिळत नाही,’ असे नमूद करून हे विचार माझे नव्हे, तर राजीव गांधींचे आहेत, असे मोदी उद्गारताच, सभागृहात हशा उसळला. सत्ताधारी सदस्यांनी या वेळी बाके वाजवून पंतप्रधानांच्या वाक्चातुर्याला दाद दिली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सोमनाथ चटर्जी यांच्याही भाषणांचे दाखले नमूद करीत, काँग्रेस सदस्यांना चिमटे काढण्याची एकही संधी पंतप्रधानांनी सोडली नाही.
> काँग्रेसने गरिबीची मुळे घट्ट रुजविली...
मनरेगावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्रात १९७२ साली त्याचे नाव ‘रोजगार हमी योजना’ होते. १९८0 साली ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना’ आली, १९८३ साली नव्या नावाने तीच योजना पुन्हा आली. १९८९ साली त्याचे नाव ‘जवाहर रोजगार योजना’ झाले. 1993 सालच्या रोजगार विमा योजनेनंतर वाजपेयी सरकारने संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना व त्यानंतर कामाच्या बदल्यात धान्य या स्वरूपात या योजनेचे संचालन केले गेले. २00६ साली याच योजनांचे रूपांतर सुरूवातीला ‘नरेगा’ आणि नंतर ‘मनरेगा’त झाले. गरिबांच्या भल्यासाठी या योजना चालवाव्याच लागतात. ६0 वर्षांच्या काळात काँग्रेस सरकारने देशात गरिबीची मुळे इतकी घट्ट रुजविली आहेत की एकवेळ मोदी उखडला जाईल, मात्र ही मुळे उखडणार नाहीत. देशात गरिबी आणि दारिद्र्याचे वेळीच निर्मूलन झाले असते तर ‘मनरेगा’सारख्या योजना चालवाव्याच लागल्या नसत्या?
> विरोधकांच्या अनुभवाचे सरकारला मार्गदर्शन हवे आहे
देशासाठी कोणी काय केले, याची ईर्षा व्यक्त करण्यासाठी संसद नाही. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना मात्र या चिंतेने पछाडले आहे की, ६0 वर्षांत जे काम आमच्या हातून झाले नाही ते २ वर्षांत मोदी सरकारने कसे करून दाखवले? संसदेत विरोधी बाकांवरही अनेक विद्वान व गुणी सदस्य आहेत. त्यांच्या अनुभवाचे सरकारला मार्गदर्शन हवे आहे. मी नवा आहे, तुम्ही अनुभवी आहात. तुमच्या सहकार्याशिवाय मी फारकाही करू शकत नाही, याची मला जाणीव आहे. कायमस्वरूपी विकास, शिक्षण, पाणी, न्यायदानातील विलंब अशा विषयांवर संसदेत उत्पादक चर्चा व्हायला हवी.