‘मेक इन इंडिया’ला बळ

By admin | Published: April 12, 2015 01:20 AM2015-04-12T01:20:49+5:302015-04-12T01:20:49+5:30

‘मेक इन इंडिया’च्या आवाहनाला ‘एअरबस’ने प्रतिसादाच्या पंखांचे बळ देत भारत आणि जगासाठी भारतात विमाने तयार करण्याची तयारी दाखविली.

'Make in India' strong | ‘मेक इन इंडिया’ला बळ

‘मेक इन इंडिया’ला बळ

Next

टुलूज (फ्रान्स ) : ‘मेक इन इंडिया’च्या आवाहनाला ‘एअरबस’ने प्रतिसादाच्या पंखांचे बळ देत भारत आणि जगासाठी भारतात विमाने तयार करण्याची तयारी दाखविली. भारतातील आऊटसोर्सिंगचा व्यवसाय २ अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचा इरादाही एअरबसने व्यक्त केला आहे.
मेक इन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. विदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान मिळविणे हा योजनेमागचा उद्देश आहे. भारतात अंतिम जुळणी प्रकल्प उभारण्याची, तसेच भारतात लष्करी वाहतूक विमाने व हेलिकॉप्टर्ससाठी पायाभूत सुविधा उभारण्याची इच्छाही एअरबसने व्यक्त केली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाचे धोरण आणि थेट विदेशी गुंतवणूक धोरणातहत भारतात विस्तार केला जाणार आहे, असेही एअरबस ग्रुपच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
एअरबस डिफेन्स अँड स्पेसने टाटा समूहासोबत भारतात अत्याधुनिक सी-२९५ विमानांचे उत्पादन करण्यासाठी एक प्रस्तावही दिला. भारतीय वायुदलातील जुन्या अ‍ॅवो विमानांच्या जागी या नवीन विमानांचा समावेश करण्यासंबंधीचा हा प्रस्ताव आहे. एअरबस हेलिकॉप्टरर्ससुद्धा भारतीय कंपन्यांसोबत विविध हेलिकॉप्टर कार्यक्रमाबाबत चर्चा करीत आहे. याशिवाय भारतात भागीदारीने इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स विकसित करण्याचाही बेत आहे, तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या लढाऊ विमानासंबंधीच्या कार्यक्रमालाही पाठबळ देण्यासंबंधीची चर्चा प्रगतिपथावर आहे. फ्रान्स दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी टुलूजस्थित एअरबसच्या कारखान्याला भेट देऊन कारखान्यातील कामकाजाची माहिती घेतली. त्यांनी कारखान्यातील जुळणी विभागालाही भेट दिली. यावेळी पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. (वृत्तसंस्था)

सेल्फी... टुलूज येथील एअरबसच्या प्रकल्पाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीय कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेऊन या क्षणाच्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवल्या. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोदी यांच्याभोवती अशी गर्दी केली होती.

४पॅरिस : फ्रान्स आणि भारत विविध क्षेत्रांत भागीदारी करीत सहकार्याचे नवीन पर्व सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांच्यातील शिखर चर्चेतील फलश्रुती होय. इस्रो आणि फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज दरम्यान झालेल्या करारातहत दूरसंवेदी उपग्रह, उपग्रह संचार, अंतराळशास्त्रासह संबंधित विविध क्षेत्रांत सहकार्य केले जाणार आहे.

४फ्रान्स दिल्ली-चंदीगड रेल्वेमार्गाची गती ताशी २०० किलोमीटर वाढविण्यासाठीच्या अभ्यासात भागीदार होणार आहे. अंबाला आणि लुधियाना रेल्वेस्टेशनचा विकास करण्यासाठीही मदतीची तयारी दाखविली आहे. याशिवाय भारतात स्मार्ट सिटीज् विकसित करण्याकामीही फ्रान्स हातभार लावणार आहे. ही शहरे भारत निश्चित करणार आहे.

४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या विश्वयुद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या नेयूवे-चॅपेल (लिली) स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. पहिल्या विश्वयुद्धात फ्रान्सच्या बाजुने लढतांना १० हजार भारतीय जवानांनी प्राणांची आहुती दिली होती. या स्मारकाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होय.

फ्रेंच कंपन्यांचा स्पष्ट पारदर्शक नियमांचा आग्रह
पॅरिस : व्यवसायाच्या दृष्टीने आड येणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत फ्रान्समधील उद्योगपतींनी स्पष्ट, पारदर्शक नियमांचा आग्रह धरीत भारतात गुंतवणूक करण्याबाबत स्वारस्य दाखविले. यासाठी भारतीय कंपन्यांसोबत पाच कार्यगट स्थापन करण्याचाही निर्णयही फ्रान्सच्या उद्योगजगताने घेतला आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय आणि फ्रान्समधील उद्योगपतींची बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत फ्रान्समधील उद्योगपती, सीईओंनी भारतात व्यावसायिकदृष्ट्या आड येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला.
या बैठकीत फ्रान्समधील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करण्यासह ‘मेक इन इंडिया’ योजनेबाबत स्वारस्यही दाखविले आहे.


फ्रान्सच्या उद्योगपतींचे नेतृत्व पॉल हर्मेलिन यांनी केले. भारतात ज्या प्रकारे उद्योग, व्यवसाय केला जातो त्यात अडचणी आहेत. गुंतवणुकीसीाठी स्पष्ट आणि पारदर्शक नियम जरूरी असतात. तसेच नियम स्थिर राहणेही आवश्यक असते, असे हर्मेलिन यांनी अधोरेखित केले.
हर्मेलिन हे कॅपजेमिनी ग्रुप आॅफ फ्रान्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विषमतेमुळे विदेशी गुंतवणूकदारांसाठी अडचणी निर्माण होतात. प्रकल्प पूर्ण होतील, असे स्पष्ट करणारे दहा प्रतीकात्मक कार्यक्रम तयार केले जावेत. संबंधाला नवीन आयाम देण्याची गरज आहे. तसेच करारांचा आदर राखत ते अमलात आणले जावेत.
या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ध्रुव साहनी यांनी केले. भारतातील नवीन सरकारबाबत फ्रान्समधील कंपन्या उत्साहित आहेत, असेही ते म्हणाले.

 

Web Title: 'Make in India' strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.