निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यांवर कायदा करा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला सूचना
By admin | Published: July 5, 2017 02:10 PM2017-07-05T14:10:20+5:302017-07-05T14:10:20+5:30
निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांवर आतापर्यंत कायदा का तयार केला नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारला आहे. निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यावरच्या एका प्रकरणातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ही सूचना केली आहे.
केंद्र सरकारनं संविधानातील कलम 324(2) अंतर्गत कायदा बनवणं आवश्यक होतं. मात्र आतापर्यंत तो कायदा अस्तित्वात आला नाही, अशी टिपण्णीही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यांवर संसदेला असा कायदा करण्यासाठी आम्ही आदेश देऊ शकत नाही, तरीही केंद्र सरकारनं असा कायदा न बनवल्यास आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू, असंही सर्वोच्च न्यायालय म्हणालं आहे. निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यांवरच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत निवडणूक आयोगातल्या नियुक्त्यांसंदर्भात अद्यापही कायदा का बनवला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
या प्रकरणात केंद्र सरकारनंही सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक आयोगात आतापर्यंत झालेल्या नियुक्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळली नाही. भारतीय संविधानाचं कलम 324(2) हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांशी जोडलेले आहेत. त्यानुसार त्यांच्या नियुक्तीचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना सोडून इतर निवडणूक आयुक्तांची संख्या निश्चित करण्याचा अधिकारही राष्ट्रपतींजवळ असतो. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बनवलेले नियम संसदेच्या नियमांच्या अधीन आहेत. मात्र संसदेनं आतापर्यंत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात कोणताही कायदा बनवला नाही. मात्र संविधानातील कलम 324(2)नुसार त्यांना पदावरून हटवण्याचाही अधिकार आहे.
आणखी वाचा
(अचलकुमार ज्योती मुख्य निवडणूक आयुक्त)
(निवडणूक आयुक्तांनी तपासली नाकाबंदी)