'मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा, मग...', बसपा खासदाराने इंडिया आघाडीत प्रवेशासाठी पक्षाची अट सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 08:29 AM2023-12-28T08:29:45+5:302023-12-28T08:31:21+5:30
इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी बसपने एक अट घातली आहे, या अटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
देशात काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षांनी तयारी केली आहे. देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण, आघाडीत अजुनही बसप'चा समावेश झालेला नाही. यासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता सामील होण्यासाठी बसप'ने काही अटी घातल्याचे बोलले जात आहे.
मायावतींचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या एका नेत्याने बसपाला विचारणा केली आहे. मायावती गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत असून, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मायावतींना इंडिया आघाडीत सहभागी होण्याची अट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. अमरोहाचे खासदार आणि मायावतींचे जवळचे मानले जाणारे मलूक नागर यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीमध्ये मायावतींना पंतप्रधानांचा चेहरा बनवल्याशिवाय आघाडी अर्थहीन आहे.
लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र
खासदार मलुक नागर म्हणाले की, जर इंडिया आघाडीला खरोखरच भाजपचा पराभव करायचा असेल तर मायावती यांना आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवावे लागेल, जर तसे झाले नाही तर ते कुणालाही शक्य नाही.
मलूक नागर म्हणाले की, मायावतींची १३ टक्के मते आणि विरोधकांची ३७-३८ टक्के मते निर्णायक आघाडी देऊ शकतात, जी यूपीमध्ये भाजपच्या ४४ टक्क्यांपेक्षा खूप जास्त आहे, पण यासाठी मायावतींना भारताने पंतप्रधान पदाच्या चेहरा बनवणे आवश्यक आहे. बसपा खासदार म्हणाले की, जर बसपा इंडिया आघाडी सोबत आली तर संपूर्ण देशातील मतदानाच्या टक्केवारीचा इंडिया आघाडीला फायदा होईल आणि मग भाजपला रोखता येईल.