न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लीफिकेशन टेस्ट अनिवार्य करा
By Admin | Published: August 1, 2014 03:56 AM2014-08-01T03:56:25+5:302014-08-01T03:56:25+5:30
ड्रग अॅण्ड कॉस्मेटिक कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.
विजय दर्डा यांची मागणी : तोपर्यंत लोकांना आरोग्य सेवेचा खरा लाभही मिळणार नाही
दिल्ली : ड्रग अॅण्ड कॉस्मेटिक कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. जोपर्यंत रक्त आदान (ट्रान्सफ्युजन) सेवा अधिक चांगली होणार नाही तोपर्यंत लोकांना आधुनिक आरोग्य सेवेचा खरा लाभही दिला जाऊ शकणार नाही, असे विजय दर्डा म्हणाले.
रुग्णांना प्रभावी रक्त आणि दुसरे घटक उपलब्ध करून देणे, हा आमचा उद्देश असायला पाहिजे. सुरक्षितता आणि एखाद्या रुग्णाची गरज म्हणून ते पुरेसे आहे. अलीकडच्या काळात या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आहेत. त्यामुळे ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक कायद्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु आजही जुन्या पारंपरिक मानवी रक्त व रक्त घटकांंच्या व्यवस्थेला लायसन्स देण्याचा क्रम सुरूच आहे. त्यात आधुनिक आणि सुरक्षित रक्त घटकांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
टीटीआय, उदाहरणार्थ एचआयव्ही-१ आणि २, हेपेटायटिस-बी, सी, मलेरिया सिफलिसची पारंपरिक पद्धतीने तपासणी करावी, अशी कायद्यात तरतूद आहे. सरकारच्या कायद्यात जी व्यवस्था आहे, त्यात पारंपरिक प्रणालीअंतर्गत रक्त देतेवेळी घातक आजाराच्या संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. रक्तदानातून होणाऱ्या संक्रमणाचे प्रमाण ३.५ टक्के एवढे आहे. याउलट रक्तदान करणारे केवळ २ ते २.५ टक्के लोक एचआयव्ही आणि एचसीव्हीने बाधित असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते, असे दर्डा यांनी यावेळी स्पष्ट केले.
न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लीफिकेशन टेस्ट आधुनिक प्रणाली असल्याचे स्पष्ट करून विजय दर्डा म्हणाले, जगातील सर्व विकसित आणि विकसनशील देशांत ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. रक्तातून होणारे संक्रमण समाप्त करण्यासाठी आम्ही भारतातही ही चाचणी अनिवार्य केली पाहिजे. परंपरागत पद्धतीने करण्यात आलेल्या चाचण्यांत रक्त संक्रमण झाल्याचे दिसत नाही. परंतु न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लीफिकेशन टेस्टद्वारे करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मात्र रक्त संक्रमण झाल्याचे स्पष्ट दिसले. एक युनिट रक्त तीन रुग्णांना रेड सेल्स, प्लाज्मा आणि प्लेटलेटमुळे संक्रमित करू शकते, ही चकित करणारी बाब आहे. याच कारणामुळे भारतात न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लीफिकेशन टेस्ट कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य करण्याची माझी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)