वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; गायक सोनू निगमचा वादग्रस्त सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:24 PM2018-08-09T17:24:34+5:302018-08-09T17:26:27+5:30
नेहमीच सडेतोड वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगमने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
मुंबई - नेहमीच सडेतोड वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगमने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या शेल्टर होम बलात्कारकांड प्रकरणी प्रतिक्रिया देताना सोनू निगम याने देशात वेश्या व्यवसाय कायदेशीर ठरवण्याचा सल्ला दिला आहे.
रिपब्लिक या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, "देशात होत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांसाठी आपली लोकशाही जबाबदार आहे. मुलांना शाळेमध्ये लैंगिक शिक्षण दिले जात नाही. हे या सर्वांमागचे मुख्य कारण आहे. भारतात विविध जातीधर्माचे लोक राहतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा सामना कसा करायचा, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे."
"मुझफ्फरपूरला जे काही झाले ते या प्रकारांचा एक छोटासा भाग आहे. अशा प्रकारची कित्येक प्रकरणे समोरच येत नाहीत. सेक्स काय असतो हे शाळेत मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे. तसेच त्यापासून पुढे काय होऊ शकते हेही सांगितले पाहिजे. तसेच दुसऱ्याच्या शरीराचा सन्मान कसा करावा, हे सुद्धा समजावून सांगण्याची गरज आहे, "असेही सोनूने पुढे सांगितले.
यावेळी वेश्यावृत्ती वैध करण्याचा सल्ला देताना सोनूने नेदरलँडचे उदाहरण दिले. "एकंदरीत या देशात वेश्यावृत्ती वैध ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मी नेदरलँडची राजधानी अॅम्स्टरडॅम येथे होतो. तिथे वेश्या व्यवसाय वैध आहे. एका विशिष्ट्य श्रेणीतील महिलांना तिथे वेश्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मोठे पोलीस पथक वा फौजफाटा यांची तिथे गरज पडत नाही कारण सर्वच गोष्टी सामान्य आहेत," असेही त्याने सांगितले.