राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष बनवा !
By admin | Published: November 1, 2016 03:03 AM2016-11-01T03:03:10+5:302016-11-01T03:03:10+5:30
राहुल गांधी यांना त्वरित पक्षाध्यक्ष बनवायला हवे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांना त्वरित पक्षाध्यक्ष बनवायला हवे. त्याबाबत होणारी अटकळबाजी पक्ष आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य पाहता योग्य ठरत नाही, असे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविण्याविषयी किंवा तशा प्रकारच्या दुसऱ्या ढाच्यात बसविण्याबाबत पक्षाने निर्णय घ्यावा. त्याबाबत अटकळी होत राहणे पक्षासाठी ठीक नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होते, असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी हे सातत्याने देशभरात लोकांच्या संपर्कात असून पक्षाला बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्ही जनतेकडे पक्षाचे सामाजिक धोरण आणि विचार ठोसपणे मांडावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना काँग्रेसकडे आकर्षित केले जावे.
१८ वर्षांचे युवक पहिल्यांदा मतदान करणार असून त्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडले जावे, यावर्षीच्या प्रारंभी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून उत्तर प्रदेश आणि पंजाब ही राज्ये महत्त्वाची ठरतात. उत्तर प्रदेशात आपल्याला चांगल्या रणनीतीसह पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल, तरच चांगला निकाल मिळू शकेल. पंजाबात गेल्या सहा महिन्यांमध्ये परिस्थिती खूप बदलली असून आमचे परिश्रम कामी आले आहेत.पक्षाचे मनोधैर्य आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले.
>आर्थिक सुधारणांची सूत्रधार काँग्रेसच
आर्थिक सुधारणांची सूत्रधार काँग्रेसच असून त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मनमोहनसिंग १९९१ मध्ये अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणांना प्रारंभ झाला. आज आपण या सुधारणांचे रजतजयंती वर्ष साजरे करीत आहोत. मोदी सरकारने हाच आर्थिक सुधारणा कार्यक्रम पुढे नेण्याचे काम चालविले आहे. गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदा जनतेने एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत दिले आहे. मोदी सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या; मात्र त्या पूर्ण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून गेल्या अडीच वर्षांमध्ये या सरकारला कोणताही नवा आर्थिक किंवा सामाजिक विचार समोर आणता आलेला नाही. या सरकारने यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या योजनांचे रिपॅकेजिंगचे काम सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.