राममंदिर उभारणीसाठीे समझोता घडवून आणू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:31 AM2018-12-07T06:31:36+5:302018-12-07T06:31:49+5:30
राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.
अयोध्या : राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.
ते म्हणाले की, अयोध्येमध्ये राममंदिर उभारावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास भाजपा त्याची अंमलबजावणी करील किंवा या प्रश्नाशी संबंधित सर्व पक्षकारांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करू. जर सारे पर्याय संपले, तर संसदीय मार्गांचा अवलंब करून तोडगा काढला जाऊ शकतो. बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू उद््ध्वस्त केली हा वादविवादाचा विषय होऊच शकत नाही. कारसेवकांनी केलेली कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. रामजन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेने आजवर जो लढा दिला आहे तो देशातील जनतेला ज्ञात आहे.
मौैर्य यांनी सांगितले की, रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी गोळीबारात ठार झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. रामभक्तांच्या मनात मुस्लिमांविषयी द्वेष नाही. आमचे विरोधक मुस्लिमांचे लांगुलचालन करून सलोख्याचे वातावरण बिघडवत असतात.
>उद्धव ठाकरेंना टोला
रामजन्मभूमीत रामलल्लांना एखाद्या तुरुंगात ठेवल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया तिथे दर्शन घेऊन आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यावर टीका करताना मौर्य म्हणाले की, रामलल्ला हे अनादी व अनंत असून त्यांना कोणीही तुरुंगात डांबणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. राममंदिर बांधू इच्छिणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही.