छोटयाशा मालदीवने धुडकावले भारताचे 'युद्ध सरावा'चे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 01:44 PM2018-02-27T13:44:17+5:302018-02-27T13:50:10+5:30
'मीलन' या सागरी युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारताने दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे. येत्या 6 मार्चपासून मीलन हा एकत्रित सागरी युद्ध सराव सुरु होणार आहे.
नवी दिल्ली - 'मीलन' या सागरी युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारताने दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे. येत्या 6 मार्चपासून मीलन हा एकत्रित सागरी युद्ध सराव सुरु होणार आहे. नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी मालदीवने निमंत्रण नाकारल्याची माहिती दिली. हा नकार देताना मालदीवकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. लांबा यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
हा नकार म्हणजे मालदीवचे विद्यमान सत्ताधारी अब्दुल्ला यामीन आणि भारत सरकारमधील मतभेदांची दरी रुंदावत चालल्याचे लक्षण आहे. मालदीवमध्ये विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामीन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार देत न्यायाधीशांनाच बेडया ठोकल्या. ज्या दिवशी मालदीवमध्ये आणीबाणी संपणार होती. त्याचदिवशी आणीबाणीचा कालावधी आणखी 30 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला.
त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेत आपली नाराजी नोंदवली. मालदीवचे विद्यमान सत्ताधारी चीनच्या निकट आहेत. या मीलन युद्ध सरावात एकूण 16 देश सहभागी होणार आहेत अशी माहिती नौदलातील सूत्रांनी दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार द्विपसमूहावर मीलन सागरी युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. मीलनमध्ये विविध देशांचे नौदल प्रमुखही सहभागी होणार असून यावेळी दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीवरही चर्चा होईल.