मालेगाव बॉम्बस्फोट: प्रज्ञासिंह ठाकूरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:32 AM2019-06-21T04:32:25+5:302019-06-21T04:32:48+5:30
खटल्यास कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मागितली होती परवानगी
मुंबई : मध्य प्रदेशमधील भाजपची नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिने खटल्यास कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. प्रकृती आणि खासदारकीचे कामकाज करता यावे, यासाठी तिने खटल्यास गैरहजर राहण्याची मुभा मागितली होती.
प्रज्ञासिंहला अनेक आजार आहेत. या आजारांमुळे न्यायालयात उपस्थित राहण्याच्या स्थितीत नाही, असे प्रज्ञासिंहने अर्जात म्हटले आहे. ‘मी साध्वी असल्याने माझ्या साधनेकरिता मला कडक नियम पाळावे लागतात. तसेच खाण्यापिण्याचे पथ्यही पाळावे लागते. या सर्वांचा विचार करता मला प्रत्येक आठवड्याला भोपाळ ते मुंबई असा प्रवास करणे शक्य नाही,’ असेही तिने अर्जात नमूद केले आहे. मध्य प्रदेशची खासदार असल्याने आपण न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही. तसेच पक्षादेशानुसार, सध्या सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात एकही दिवस गैरहजर राहण्याची मुभा नाही. त्यामुळे किमान लोकसभा अधिवेशन संपेपर्यंत खटल्यास अनुपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती तिच्या वकिलांनी केली.
खटल्यास अनुपस्थित राहण्यासाठी दिलेल्या सबबी पुरेशा नाहीत आणि त्या खऱ्याही नाहीत, असे म्हणत विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. व्ही.ए. पडाळकर यांनी प्रज्ञासिंहचा अर्ज फेटाळला. मात्र, तिच्या सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारच्या सुनावणीत तिला अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. गेल्या सुनावणीत प्रज्ञासिंहने कोर्टरूम स्वच्छ नसल्याने घातलेल्या गोंधळाची न्यायाधीशांनी दखल घेत म्हटले की, प्रज्ञासिंह ठाकूरने गेल्या सुनावणीत म्हटले की, कोर्टरूम स्वच्छ नाही, मानवता दाखवत न्यायालयाने तिला वारंवार खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्यास तिने नकार दिला. तिने केलेल्या विधानांत तथ्य नाही. न्यायालयाच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे, याकडे तिचे लक्ष गेले नाही का?
कागदपत्रे दिली नाहीत
‘संसदेत उपस्थित राहणे आणि पक्षादेशाचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, पक्षादेशासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली नाहीत,’ असे न्यायाधीशांनी प्रज्ञासिंहचा अर्ज फेटाळताना म्हटले.