मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत साक्षीदाराने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 04:11 PM2021-12-28T16:11:46+5:302021-12-28T16:11:55+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली. तसेच, ATSवर जबरदस्तीने योगी आदित्यनाथ आणि RSSच्या चौघांची नावे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.
मुंबई: 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला नवे वळण लागले आहे. मंगळवारी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली, तसेच एटीएसवर अत्याचार केल्याचा आरोपही केला आहे. साक्ष फिरवणारा हा 15वा साक्षीदार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 220 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
'एटीएसने अत्याचार केला'
2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने मंगळवारी महत्त्वाचे खुलासे केले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एटीएसने अत्याचार केल्याचे साक्षीदाराने विशेष एनआयए न्यायालयात सांगितले. एटीएसने योगी आदित्यनाथ आणि आरएसएसमधील अन्य चार जणांची नावे सांगण्यास भाग पाडले होते, असेही त्यांने न्यायालयात म्हटले.
2008 Malegaon blast case | A witness tells Special NIA court that he was tortured by ATS, the then probe agency of the case. He also told the court that ATS forced him to falsely name Yogi Adityanath and 4 other people from RSS.
— ANI (@ANI) December 28, 2021
मालेगाव स्फोटात 6 मृत्यू तर 100 हून अधिक जखमी
29 सप्टेंबर 2008 रोजी मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या मालेगाव शहरातील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट झाला होता. त्यात 6 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, साक्षीदाराने कोर्टात सांगितले की, एटीएसने योगी आदित्यनाथ, इंद्रेश कुमार, देवधर आणि काकाजीसह आरएसएसच्या पाच लोकांची नावे घेण्यास भाग पाडले.
मालेगाव प्रकरणातील आरोपी जामिनावर बाहेर
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या साक्षीदाराने आपला जबाब बदलला होता. त्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने त्याला पक्षद्रोही घोषित केले. लेफ्टिनेंट कर्नल पुरोहितसह या प्रकरणात भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर, मेजर (सेवानिवृत्त) रमेश उपाध्याय, अजय रहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी आरोपी आहेत. हे सर्व सध्या जामीनावर बाहेर आहेत.