मालेगाव बॉम्बस्फोट खटला : लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहितना अखेर नऊ वर्षांनी जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:00 AM2017-08-22T06:00:01+5:302017-08-22T06:00:01+5:30

Malegaon bomb blast case: left Colonel Prasad Purohit finally gets bail in nine years | मालेगाव बॉम्बस्फोट खटला : लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहितना अखेर नऊ वर्षांनी जामीन

मालेगाव बॉम्बस्फोट खटला : लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहितना अखेर नऊ वर्षांनी जामीन

Next

नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.
एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने ते मंजूर करून एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. न्यायालयात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, साक्षी-पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, पासपोर्ट जमा करणे व पूर्वानुमतीशिवाय देश सोडून बाहेर न जाणे अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला. खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पुरोहित निलंबितच राहतील, पण आता जामीन मिळाल्याने, त्यांना लष्कराच्या एखाद्या आस्थापनेशी औपचारिकपणे ‘अटॅच’ केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
या निकालपत्रात केलेले विवेचन व नोंदविलेले निष्कर्ष फक्त कर्नल पुरोहितच्या जामिनाचा निर्णय करण्यासाठी आहेत. विशेष न्यायालयाने इतर आरोपींच्या जामिनाचा विचार करताना किंवा अंतिमत: खटला चालविताना त्याची दखल न घेता गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, तसेच कर्नल पुरोहित यांनी जामिनाच्या अटींचा भंंग केल्यास, तो रद्द करण्यासाठी एनआयए अर्ज करू शकेल, अशी मुभाही दिली गेली.

या कारणांमुळे पुरोहित ‘बाहेर’
एनआयएने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र आणि महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेले मूळ आरोपपत्र यातील तफावत, खटला लवकर संपण्याची शक्यता नसणे आणि पुरोहित यांचे आठ वर्षे आठ महिने तुरुंगात असणे या बाबी जामीन देताना न्यायालयाने नमूद केल्या. तपासी यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार असला तरी आरोपीच्या स्वातंत्र्याचा एका मर्यादेपलीकडे अनाठायी संकोच केला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.

मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत आस्ते धोरण स्वीकारा, असे आपणास सांगण्यात आल्याची तक्रार काही काळापूर्वी सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनी केली होती. त्यानंतर त्या या खटल्यातून बाहेर पडल्या होत्या.

जामीन मिळताच तळोजा कारागृहासमोर गर्दी
तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांची सुटका होणार असल्याची माहिती मिळताच दुपारी एकपासून प्रसार माध्यम आणि नागरिकांनी कारागृहासमोर गर्दी केली होती. दस्तावेजाची पूर्तता न झाल्याने पुरोहित यांची सुटका एक दिवस लांबली.

काँग्रेसची टीका
कर्नल पुरोहितच्या जामिनावर झालेल्या सुटकेवरून काँग्रेसने भाजपा व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना सोडण्यासाठी केंद्र सरकारने एनआयएचा वापर केला, एनआयएच्या प्रमुखांना दोनदा मुदतवाढ दिली आणि निवृत्तीनंतरही त्यांना बक्षीस दिले जाईल.
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस

न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याच्याशी सरकार वा भाजपाचा संबंध असूच शकत नाही. यात कसलेही कट कारस्थान नाही.
- किरन रिजिजू, केंद्रीय गृहराज्यमंत्री

Web Title: Malegaon bomb blast case: left Colonel Prasad Purohit finally gets bail in nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.