मलिक म्हणाले, ‘ते माझे वैयक्तिक मत’ वादग्रस्त विधानानंतर घुमजाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 03:04 AM2019-07-23T03:04:09+5:302019-07-23T03:04:46+5:30
वादग्रस्त वक्तव्यावरील गदारोळानंतर विधान योग्य नसल्याची कबुली
श्रीनगर : काश्मीरला लुटणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले पाहिजे, असे विधान राज्यपाल या पदावरील व्यक्तीने करणे योग्य नाही; पण संताप, उद्वेगातून मी ते केले. ते माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी केला.
एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या विधानामुळे गदारोळ माजल्यानंतर दुसºया दिवशी आपली भूमिका सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये अनेक राजकीय नेते, नोकरशहा हे कमालीचे भ्रष्ट आहेत. ते गुन्हेगार आहेत. त्यांच्याविषयी संताप व्यक्त करताना राज्यपाल म्हणून मी संयमाने बोलणे आवश्यक होते. मात्र, एक व्यक्ती म्हणून विचाराल, तर मी जे बोललो तेच माझे खरे मत आहे.
कारगिल लडाख पर्यटन महोत्सवाचे उद््घाटन सत्यपाल मलिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या दहशतवादी युवकांनी हातात बंदुका घेतल्या आहेत ते निरपराध लोकांना, पोलीस अधिकाऱ्यांना मारतात. तुम्ही या लोकांना का मारत आहात? अशांना मारा ज्यांनी तुमच्या काश्मीरची सारी दौलत लुटली आहे. या भ्रष्टाचारी लोकांपैकी एकाला तरी कधी तुम्ही मारले आहे का?
काश्मीरमध्ये आजवर ज्या घराण्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्याकडे अमर्याद संपत्ती आहे. त्यांचे काश्मीरमध्ये एक घर आहे तर दिल्ली, दुबई व लंडनमध्येही त्यांनी घरे विकत घेतली आहेत. काश्मीरमध्ये पूर्वी मंत्रीपद उपभोगलेल्यांपैकी दोन-तीन महत्त्वाच्या व्यक्ती जामिनासाठी येत्या दोन-तीन महिन्यांत धावपळ करताना दिसतील. त्यावेळेला तुम्ही माझी तारीफच कराल. काश्मीरमधील राजकारणी दुतोंडी आहेत. दिल्लीमध्ये ते आमच्याशी हसतखेळत चर्चा करतात. काश्मीरमध्ये मात्र जनतेची माथी भडकवितात, असा आरोपही त्यांनी केला.
हे आवाहन भयावह
सत्यपाल मलिक यांच्यावर टीका करताना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राजकारणी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांना ठार मारण्याचे आवाहन राज्यपालांनी दहशतवाद्यांना करणे भयावह आहे.
बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी दुसºयांना प्रोत्साहन देणाºयांनी स्वत:ची प्रतिमा दिल्लीत कशी आहे, हे आधी तपासून पाहावे. त्यावर ओमर अब्दुल्ला हे बालिश राजकारणी असल्याचा टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला आहे.