Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:59 PM2023-02-12T15:59:21+5:302023-02-12T16:05:06+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गौतम अदानींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adnai) यांना मदत केल्याचा आणि सत्तेत आल्यापासून खऱ्या मुद्द्यांवर न बोलून लोकशाही नष्ट केल्याचा आरोप केला. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात एका रॅलीमध्ये ते बोलत होते.
यावेळी खर्गे म्हणाले, '2019 मध्ये गौतम अदानींची मालमत्ता 1 लाख कोटी रुपये होती. अडीच वर्षांत त्यांची संपत्ती 13 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. हे तेच अदानी होते, ज्यांच्या फ्लाइटने मोदी शपथ घेण्यासाठी आले होते. अशी कोणती जादूची कांडी आहे, ज्याने अदानींची संपत्ती एवढी वाढवली? मोदींनी जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिल्याने हे घडले', असा आरोप खर्गेंनी केला.
काँग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले, 'मी मोदीजींना विनंती करेन की, देशातील गरीब, शेतकरी आणि मजुरांना ही कला शिकवावी. मग तुम्हाला इतके कष्ट करावे लागणार नाहीत. तुम्ही अदानींना 13 लाख कोटी रुपयांची मदत केली, देशातील लोकांना किमान 13 लाखांची मदत करा.' यावेळी भाजप सरकार लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की, 'माझ्या सभागृहातील भाषणासोबतच राहुल गांधींच्या भाषणाचा काही भागही हटवण्यात आला. काँग्रेस पक्षाने खरे मुद्दे मांडण्याचे काम केले. माझी कविताही काढली. त्यात असंसदीय काय होतं?... मोदीजींनी काही कविताही वाचल्या होत्या, पण त्या काढल्या नाहीत,' असंही खर्गे म्हणाले.
'लोकशाहीवर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही'
झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, 'मोठ्या आणि जुन्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने निवडून आलेल्या बिगर काँग्रेस सरकारांना बरखास्त करण्यासाठी कायद्यांचा वापर केला. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी एकाच दिवसात राज्यातील भाजपची तीन सरकारे पाडली. ज्या पक्षाने आणीबाणी लादली, त्यांना लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.'