मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईच्या दौऱ्यावर! शरद पवारांना भेटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:29 AM2018-07-01T04:29:42+5:302018-07-01T04:30:42+5:30
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
ते काँग्रेसच्या राज्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करतील. दिल्लीत शनिवारी खरगे यांनी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना बोलावून घेतले होते. या बैठकीत काँग्रेसच्या राज्यातील स्थितीविषयी चर्चा झाली. महाराष्ट्रात पक्ष मजबूत नसल्याबद्दल खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आणि २0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्ता पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना दिल्या.
या बैठकीत काही नेत्यांनी आपली गाºहाणी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य आघाडीबाबतची मते खरगे यांना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आपण राज्याचा दौरा करून व सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकूनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच हर्षवर्धन पाटील, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, राजीव सातव, नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते.
भाजपाविरोधी आघाडी होणे सोपे नाही
देशातील सर्व राज्यांमध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होणे वाटते इतके सोपे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत ते म्हणाले की, माझ्या अनेक सहकाºयांना भाजपाविरोधी आघाडी होणे गरजेचे आहे, असे वाटते. पण माझ्या मते ते सोपे नाही.
ती करण्यात असंख्य अडचणी आहेत.
त्यामुळे आघाडीचा पंतप्रधानपदाचा
उमेदवार कोण ही
चर्चाही अर्थहीन आहे.