खरगे अध्यक्षपदी अन् नितीश कुमारांचा हिरमोड, पंतप्रधानपदाचा उमेदवार व्हायचे होते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 06:41 AM2024-01-30T06:41:28+5:302024-01-30T06:42:46+5:30
Nitish Kumar: भारताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्याच दिवशी आधी या आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
नवी दिल्ली - भारताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्याच दिवशी आधी या आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असा नितीशकुमार यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच त्यांनी इंडिया आघाडीला आकार देण्याचा प्रयत्न केला. आघाडीचे नेतृत्व नितीशकुमार यांना करायचे होते. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनही त्यांना जनतेसमोर येण्याची इच्छा होती. मात्र, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड होणार असल्याचे कळताच नितीशकुमार यांचा हिरमोड झाला. त्यांनी त्या दिवशीच इंडिया आघाडीपासून सर्व संबंध तोडले.
ते जाणार होते तरीही..
राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांना केलेले तीन दूरध्वनी त्यांनी उचलले नाहीत. बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह हे नितीशकुमार यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते. मात्र, त्यांच्याशी बोलणी करण्यास त्यांनी नकार दिला. ते इंडिया आघाडीला रामराम ठोकून एनडीएमध्ये जाणार हे निश्चित झाल्यानंतरही काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीशकुमारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीशकुमार यांनी या दोघांना काहीही प्रतिसाद दिला नाही.