मल्ल्या यांच्याविरुद्ध नवा गुन्हा दाखल
By admin | Published: August 14, 2016 02:01 AM2016-08-14T02:01:58+5:302016-08-14T02:01:58+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाकडून (एसबीआय) घेतलेल्या १६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीतील कथित अनियमिततेबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने विजय मल्ल्या
नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाकडून (एसबीआय) घेतलेल्या १६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीतील कथित अनियमिततेबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे.
एसबीआयने तक्रार केल्यानंतर मल्ल्या व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जाची पुनर्रचना करताना मल्ल्या यांनी खरी माहिती दडविल्याचा एसबीआयचा आरोप आहे. मल्ल्यांच्या उड्डयन कंपनीने २०१० मध्ये दुसऱ्यांदा कर्ज पुनर्रचना करून १७ कर्ज पुरवठादारांच्या महासंघाकडून ६,९०० कोटी रुपये घेतले होते. एसबीआयने किंगफिशर एअरलाइनला १६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये बँकेने कर्जासाठी तगादा लावत कर्जापोटी गहाण ठेवलेले युबी ग्रुप कंपनीमधील शेअर्स विकले. तथापि, त्यातून केवळ ११०० कोटी रुपये गोळा होऊ शकले. पंजाब नॅशनल बँक व आयडीबीआय बँकेचे मल्ल्यांच्या कंपनीकडे प्रत्येकी ८०० कोटी रुपये असून, बँक आॅफ इंडियाचे ६५० कोटी, बँक आॅफ बडोदाचे ५५० कोटी, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे ४१० कोटी रुपये थकले आहेत.
याशिवाय युको बँकेला त्यांच्याकडे ३२० कोटी रुपयांचे येणे असून, स्टेट बँक आॅफ म्हैसूर (१५० कोटी), इंडियन ओव्हरसिज बँक (१४० कोटी), फेडरल बँक (९० कोटी), पंजाब अँड सिंध बँक (६० कोटी), तसेच अॅक्सिस बँक ५० कोटी रुपये एवढे येणे लागते. बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवून मल्ल्या फरार झाले आहेत. कर्जाची परतफेड न करणे आणि ईडीसमोर हजर न झाल्याबद्दल विजय मल्ल्या यांना फरार घोषित करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पासपोर्ट आधीच झाला रद्द
बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवून मल्ल्या फरार झाले असून, बँकांच्या कर्जाची परतफेड न करणे आणि सक्तवसुली संचालनालयासमोर हजर न झाल्याबद्दल त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा पासपोर्टही रद्द केला आहे.