मल्ल्या, संपत्तीची सर्व माहिती द्या! - सुप्रीम कोर्ट
By admin | Published: April 8, 2016 03:00 AM2016-04-08T03:00:06+5:302016-04-08T03:00:06+5:30
आपल्या कंपन्यांनी सरकारी बँकांकडून घेतलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशी निघून गेलेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी स्वत:च्या, पत्नीच्या व मुलाच्या नावे असलेल्या
नवी दिल्ली : आपल्या कंपन्यांनी सरकारी बँकांकडून घेतलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशी निघून गेलेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी स्वत:च्या, पत्नीच्या व मुलाच्या नावे असलेल्या सर्व प्रकारच्या स्थावर-जंगम मालमत्तेचा तपशील येत्या १५ दिवसांत सादर करावा, असे
निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
मल्ल्या यांनी वरीलप्रमाणे ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या संपत्तीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र २१ एप्रिलपर्यंत सादर करायचे आहे. तसेच कर्ज फेडण्याचा आपला हेतू प्रामाणिक आहे हे दाखविण्यासाठी किती रक्कम रोख स्वरूपात न्यायालयात जमा करण्याची तयारी आहे व मल्ल्या स्वत: सर्वोच्च न्यायालयापुढे हजर राहू शकतात, याची माहितीही त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात द्यायची आहे.
मल्ल्यांच्या कंपन्यांना स्टेट बँक आॅफ इंडियासह १७ सरकारी बँकांनी दिलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे थकलेली आहेत. यापैकी चार हजार कोटी रुपये येत्या सप्टेंबरपर्यंत फेडण्याचा सशर्त प्रस्ताव मल्ल्या यांनी गेल्या तारखेला दिला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी थोडासा सुधारित प्रस्ताव दिला होता.
न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा मल्यांचे हे दोन्ही प्रस्ताव आपल्याला अमान्य असल्याचे बँकांनी न्यायालयास सांगितले.
अप्रत्यक्ष वाटाघाटी करून असे प्रस्ताव देण्याऐवजी मल्ल्या यांनी स्वत: येथे येऊन टेबलावर बसावे व ‘जर तर’च्या भाषेत कर्जफेडीचे वेळापत्रक देण्यापेक्षा आधी काही भरघोस रक्कम जमा करावी, असा आग्रह बँकांनी धरला. त्याच्याशी सहमत होत खंडपीठाने मल्ल्या
यांना वरीलप्रमाणे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी ठेवली.
> खंडपीठाने निर्देश देताना सुरुवातीस मल्ल्या यांनी स्वत:,पत्नी व मुलांखेरीज ‘इतर नातेवाईकां’च्या मालमत्तांचीही माहिती द्यावी, असे नमूद केले.
मल्ल्या फक्त स्वत:पुरते हिशेब द्यायला बांधील आहेत, इतरांचा नाही, असे म्हणून वैद्यनाथन यांनी यासही आक्षेप घेतला. परिणामी न्यायालयाने माहिती द्यायच्या मालमत्तांमधून ‘इतर नातेवाईकां’ना वगळले.
> सन २०१० ते २०१२ या काळात प्रत्येक वर्षी बँकांना मालमत्तांचा तपशील दिलेला असल्याने आता पुन्हा तीच माहिती पुन्हा देण्यास मल्ल्यांच्या वतीने त्यांचे ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी काहीसे आढेवेढे घेतले, त्यावर न्या. नरिमन म्हणाले, आधी दिलेली माहिती ‘अपडेट’ करण्यात काय अडचण आहे?