मल्ल्याची ६६३० कोटींची आणखी मालमत्ता जप्त!
By admin | Published: September 4, 2016 12:49 AM2016-09-04T00:49:06+5:302016-09-04T00:49:06+5:30
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती विजय मल्ल्याची ६६३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे शनिवारी आदेश दिले. मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातील
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती विजय मल्ल्याची ६६३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे शनिवारी आदेश दिले. मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातील ईडीचा हा दुसरा आदेश आहे. यात मल्ल्याच्या अलिबागजवळच्या २५ कोटी रुपये किमतीच्या फार्म हाउसचा समावेश आहे.
हवाला व्यवहारप्रकरणी ईडीने मल्ल्या आणि त्यांच्या साथीदारांचे फार्म हाऊस, फ्लॅट आणि मुदतठेवी जप्त केल्या आहेत. ईडीने अलीकडेच तपासाची व्याप्ती वाढवीत बँकांकडून घेतलेले ६०२७ कोटी रुपयांच्या कर्जाची फेड न केल्या प्रकरणाचीही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागही (सीबीआय) तपास करीत आहे. सीबीआयने गेल्या महिन्यात याबाबत नवा एफआयआर दाखल केला. त्यानंतर मल्ल्याविरुद्धची ही पहिली कारवाई आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत ८०४४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने काही महिन्यांपूर्वी १४११ कोटी रुपये मूल्यांची मालमत्ता जप्त केली होती.
हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी जारी करण्यात आलेल्या अंतरिम जप्ती आदेशातहत ईडीने अलीबागच्या मांडवा येथील २५ कोटी रुपयांचे फार्म हाऊस, बंगळुरू येथील किंगफिशर टॉवरमधील ५६५ कोटी रुपये मूल्याचे अनेक फ्लॅट, बँकेतील १० कोटी रुपयांच्या मुदतठेवी, तसेच यूएसएल, युनायटेड ब्रेवरीज लि., मॅकडोवेल होल्डिंग कंपनीचे ३६३५ कोटी रुपये मूल्यांचे शेअर्स जप्त केले आहेत. या कंपन्यांत मल्ल्या व यूबीएचएल, तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील प्रतिष्ठांनाची संयुक्तरीत्या भागीदारी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गुन्हेगारी कटाचा ईडीचा आरोप
- मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. मार्चमध्ये भारतातून पळून गेल्यानंतर तां सध्या लंडनमध्ये राहत आहेत. सरकारने त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे.
- मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्स, तसेच युनायटेड ब्रेव्हरिज होल्डिंग लि. यांच्याशी हातमिळवणी करून गुन्हेगारी कट रचला आणि बँकेच्या गटाकडून कर्ज मिळविले, असा ईडीचा आरोप आहे.
बँकांना अंधारात ठेवले...
या रमकेपैकी ४९३०.३४ कोटी रुपयांची मुद्दल रक्कम अद्यापही परत केलेली नाही. याशिवाय मल्ल्याने स्वत:च्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखालील कंपन्यांच्या नावे शेअर मिळविले. किंगफिशर एअरलाईन्सचा प्रवर्तक मल्ल्या आणि यूएचबीएल यांच्याकडे पुरेसा पैसा होता; मात्र त्याला कर्जाची परतफेड करायची नव्हती, असे दिसते. त्याने ३६०० कोटी रुपयांचे शेअर्स युटीआय इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरी सर्व्हिसेस लि. यांच्याकडे परस्पर गहाण ठेवले होते. याबाबत कर्ज पुरवठादार बँकांना कल्पना देण्याऐवजी त्यांना त्याने अंधारात ठेवले, असे ईडीच्या आदेशात म्हटले आहे.
4234.84कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या संपत्तीचे सध्याचे बाजार मूल्य ६६३० कोटी एवढे आहे.