हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी माल्ल्याची उपस्थिती
By Admin | Published: June 4, 2017 10:33 PM2017-06-04T22:33:38+5:302017-06-04T22:37:02+5:30
हाय व्होल्टेज सामना पाहण्याचा मोह भारतातून फरार असलेल्या विजय माल्ल्यालाही आवरता आला नाही
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 4 - भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते पाहतात. हाय व्होल्टेज सामना पाहण्याचा मोह भारतातून फरार असलेल्या विजय माल्ल्यालाही आवरता आला नाही. माध्यामांच्या वृत्तानुसार, बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेला भारत-पाक हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी विजय माल्ल्या आला होता. भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. एप्रिलमध्ये माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामना सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 48 षटकांत 320 धावांचे आव्हान दिले आहे. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाच्या व्यत्यामुळे पाकिस्तानला सुधारित 41 षटकांत 289 धावांचे लक्ष देण्यात आले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 21 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा केल्या आहेत.
दरम्यान, दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.
Vijay Mallya in the stands at Edgbaston in Birmingham #INDvPAKpic.twitter.com/RIr5TDW0yJ
— ANI (@ANI_news) June 4, 2017