माल्ल्याचा पुन्हा उद्दामपणा, मी पैसे परत करणार, स्वप्न बघा
By admin | Published: June 14, 2017 08:21 AM2017-06-14T08:21:13+5:302017-06-14T08:35:46+5:30
भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पण खटल्याची सुनावणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 14 - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पण खटल्याची सुनावणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. कदाचित पुढच्यावर्षी पर्यंत ही सुनावणी लांबणीवर पडू शकते. भारत सरकारकडून पुरावे सादर होऊ न शकल्याने या महत्वाच्या प्रत्यर्पण खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. मध्य लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात कोर्ट रूम क्र. ३ मध्ये चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा लाऊझी ऑर्बथनॉट यांनी सुनावणीसाठी 4 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे.
भारताच्यावतीने खटला लढवणारे वकिल एरॉन वॅटकीन्स यांनी भारताकडून पुरावे मिळायला आणखी तीन ते चार आठवडयांचा कालावधी लागेल असे न्यायालयाला सांगितले. त्यावर ऑर्बथनॉट यांनी भारताकडून लगेच प्रतिसाद मिळतो का ? असा प्रश्न विचारला. आतापर्यंत सहा महिने झाले असून महत्वाची कागदपत्रे मिळाली नसल्याचे निरीक्षण ऑर्बथनॉट यांनी नोंदवले. विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पणाच्या खटल्यावर 4 डिसेंबरपासून पुढचे दोन आठवडे सुनावणी होईल असे ऑर्बथनॉट यांनी सांगितले.
आणखी वाचा
डिसेंबरपर्यंत आवश्यक पुरावे मिळाले नाहीत तर, एप्रिल 2018 पर्यंत हा खटला पुढे ढकलला जाऊ शकतो. विजय माल्ल्ल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. 6 जुलैला न्यायालय पुरेसे पुरावे सादर झालेत की, नाही त्याचा आढावा घेईल. 6 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे माल्ल्याला सांगण्यात आले आहे. दरम्यान न्यायालयात आलेल्या माल्ल्याने पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा आपल्यातली गुर्मी दाखवून दिली.
मी पैसे परत करणार स्वप्न बघत रहा असे त्याने पत्रकारांना सुनावले. मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाच उत्तर देण्यास बांधील नाही. ओव्हलवर मला दोन मद्यपी क्रिकेटप्रेमींनी त्रास दिला आणि तुम्ही त्या घटनेला प्रसिद्धी दिली. ओव्हलवर मला भेटून अनेकांनी सदिच्छा दिल्या असे त्याने सांगितले. रविवारी ओव्हलवर भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहायला आलेल्या माल्ल्याला पाहून काहीजणांनी चोर-चोर अशा घोषणा दिल्या होत्या. भारतीय प्रसारमाध्यमांनी या घटनेला ठळकपणे प्रसिद्धी दिल्याचा राग त्याच्या मनात आहे.
विजय माल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाइन्स या आता बंद पडलेल्या विमान कंपनीच्या नावे त्याने हे कर्ज घेतले होते. दरम्यान मल्ल्याचे प्रत्यार्पण सोपे नाही. ईडीकडे असलेली कागदपत्रे ब्रिटनला पाठविली आहेत. त्यांच्या कायद्यानुसार प्रत्यार्पण मंजूर होताच मल्ल्याला परत आणले जाईल असे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी सांगितले.
Intense hate campaign by Indian media against me knows no bounds. The GOI has filed a case which is before a U.K. court. Wait for verdict.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 14, 2017