‘आमच्या मंत्र्याने चुकी केली, मी माफी मागते’, त्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी मौन सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:52 PM2022-11-14T18:52:56+5:302022-11-14T18:54:44+5:30
ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले असून, त्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत माफीही मागतली आहे. तसेच, भविष्यात असे वक्तव्य केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ममतांनी माफी मागितली
ममता बॅनर्जी नबन्नामधील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, “माझा कोणत्याही व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यावर विश्वास नाही. एखाद्याच्या दिसण्याने काहीही होत नाही. त्या खूप चांगल्या आहेत. अखिल यांनी चुकीचे वक्तव्य केले, मी त्यांचा निषेध करते आणि माफी मागते. मला राष्ट्रपतींबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान असो वा राष्ट्रपती, मी कोणावरही वैयक्तिकरित्या काहीही बोलत नाही. आम्ही त्यांना इशारा दिला आहे, भविष्यात अशा घटना घडल्यास कारवाई करू."
ममताने शुभेंदूवर हल्ला चढवला
यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, ती योग्य नाही. तीन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसावर राजकारण केले जाते. आदिवासी महिलेवर व्यंग केले जाते. आता सत्तेत आहोत, सत्तेत नसताना बघू, असे ते म्हणतात. बंगालमध्ये राहून बंगालच्या विरोधात बोलले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, बंगालला पैसे न देण्याचे दिल्लीला सांगितले जाते, असेही त्या म्हणाल्या.