‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 01:32 PM2019-06-05T13:32:24+5:302019-06-05T13:37:35+5:30
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे.
कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान. असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू. जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा आणि हा आमचा नारा आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ममता यांनी 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है' हा शेर देखील सादर केला. सूर्य उगतो तेव्हा त्याची किरण खूप प्रखर असतात ती नंतर कमी होतात, त्यामुळे घाबरू नका जेवढ्या झपाट्याने त्यांनी ईव्हीएमवर ताबा मिळवला तेवढ्याच लवकर ते जातील असंही ममता यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.
WB CM: There is nothing to be scared. Muddai Lakh bura chahe to kya hota hai, wahi hota hai jo manzoor-e-khuda hota hai. Sometimes when the sun rises, its rays are very harsh but later it fades away. Don't be scared, the faster they captured EVMs, the quicker they will go away. pic.twitter.com/vRtKHUZRQX
— ANI (@ANI) June 5, 2019
ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक
ममता बॅनर्जींनी ईव्हीएम मशीनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांचा तपास करण्यासाठी 'फॅक्ट-फाइंडिंग' समितीची स्थापन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (3 जून) पक्षाचे आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. 'आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून होईल' असं ममता यांनी पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसेच भाजपाने 23 जागांचा दावा केला होता, पण त्यांनी 18 जागा जिंकल्या आहेत. मतदानाची टक्केवारी पाहता यंदा तृणमूलला मिळालेल्या मतांचं प्रमाण 4 टक्क्यांनी वाढलं असल्याचं ममतांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या ‘जय श्रीराम’ नाऱ्याला ममता बॅनर्जींचे ‘जय हिंद’ने उत्तर
भाजपा कार्यकर्त्यांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसने ‘जय हिंद’ने उत्तर द्यायचे ठरविले आहे. त्याची सुरुवात ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटरवर हँडल व फेसबुकवरील डिस्प्ले प्रोफाईलवरही (डीपी) तो नारा दिला आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनीही लगेच त्यांचे अनुकरण केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नव्या डीपीवर जय हिंद, जय बांगला ही घोषणा लिहिली आहे. त्याशिवाय महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ईश्वरचंद्र विद्यासागर, मातंगिनी हाजरा व काझी नजरुल इस्लाम यांची छायाचित्रेही त्या डीपीमध्ये आहेत.