भाजपविराेधात आघाडीचे ममतांचे पुन्हा प्रयत्न; विराेधी पक्षांच्या मुख्यमंत्री व नेत्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:07 AM2022-03-30T05:07:27+5:302022-03-30T05:07:44+5:30
भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आराेप
काेलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विराेधी पक्षांना भाजपविराेधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हाेत असल्याचा आराेपही त्यांनी केला असून, भाजपविराेधात नवी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न ममतांनी सुरू केले आहेत. त्यांनी सर्व गैरभाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री विराेधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून, भाजपविराेधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या लढ्याची रणनीती ठरविण्यासाठी ममतांनी बैठकही बाेलाविली आहे.
ममता बॅनर्जींनी लिहिले आहे की, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असून, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा गैरवापर करून देशातील लाेकशाहीवर हल्ला हाेत आहे. निवडणुका जवळ असतात, त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन माेडवर येतात. या दडपशाहीचा प्रतिकार करायला हवा. विराेधकांचा छळ करून काेंडीत पकडण्याचे राजकारण भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे सर्व विराेधकांनी याविराेधात एकत्र येऊन या दडपशाहीचा प्रतिकार करायला हवा. प्रत्येकाला साेयीस्कर ठरेल अशा ठिकाणी सर्वांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करू, असे आवाहन ममतांनी पत्राद्वारे भाजप विराेधकांना केले आहे.
मार्च महिन्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही ममतांनी सर्व विराेधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले हाेते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला हाेता.
तृणमूलमध्ये विश्वासार्हता नाही- काँग्रेस
ममतांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सांगितले, की तृणमूलची राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, ती पूर्णपणे फसली आहे. तर तृणमूलमध्ये भाजपविराेधात लढण्यासाठी विश्वासार्हता नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल मन्नन यांनी सांगितले.
अभिषेक बॅनर्जी ईडीच्या चाैकशीला गैरहजर
तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या चाैकशीला गैरहजर राहिले.
मनी लाँड्रिंग आणि काेळसा घाेटाळ्याप्रकरणी त्यांना चाैकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले हाेते. मात्र, वैयक्तिक कारण देऊन त्यांनी हजर राहण्यास असमर्थ असल्याचे ईडीला कळविल्याचे सांगण्यात आले आहे.
चाैकशीसाठी त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात येऊ शकताे. यापूर्वी २१ मार्च राेजी त्यांची सुमारे आठ तास चाैकशी करण्यात आली हाेती.