Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 03:17 PM2024-09-22T15:17:10+5:302024-09-22T15:35:59+5:30
Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक पत्र लिहिलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे बंगालमध्ये आलेला महापूर मानवनिर्मित असल्याचा गंभीर आरोप केला. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने (DVC) सरकारशी सल्लामसलत न करता आपल्या जलाशयांमधून पाणी सोडलं, ज्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत असं म्हटलं.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पहिल्या पत्राला उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील म्हणाले होते की, डीव्हीसी जलाशयातून पाणी सोडण्याबाबत प्रत्येक टप्प्यावर राज्य अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मोठा अनर्थ टाळण्यासाठी डीव्हीसी जलाशयातून पाणी सोडणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्रात केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचा दावा फेटाळून लावला आहे.
ममता बॅनर्जी यांनी लिहिलं आहे की, "केंद्रीय जलशक्ती मंत्री दावा करतात की, डीव्हीसी जलाशयातून पाणी सोडण्याचा निर्णय सर्वानुमते आणि दामोदर व्हॅली जलाशय नियमन समितीच्या सहकार्याने घेण्यात आला होता, त्यासाठी पश्चिम बंगाल सरकारच्या प्रतिनिधींशीही चर्चा झाली. पण मी या दाव्याशी असहमत आहे. सर्व महत्त्वाचे निर्णय केंद्रीय जल आयोग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकारच्या प्रतिनिधींद्वारे एकमताने घेतले जातात."
कधी कधी राज्य सरकारला कोणतीही नोटीस न देता पाणी सोडलं जातं आणि सरकारच्या विचारांचा आदर केला जात नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी आपल्या पत्रात केला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या पत्रात लिहिलं होतं की, डीव्हीसी जलाशयातून नऊ तास जास्तीत जास्त पाणी सोडण्यात आलं होतं, ज्याची आम्हाला केवळ ३.५ तास अगोदर माहिती देण्यात आली होती. इतक्या कमी वेळेत प्रभावी आपत्ती व्यवस्थापन कसे करता येईल?
२० सप्टेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दावा केला होता की, राज्यातील लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. या व्यापक विध्वंसाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निधी जाहीर करावा आणि मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी डीव्हीसी जलाशयातून पाणी सोडल्यामुळे आलेल्या पुराबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पत्राला उत्तर दिलं होतं.