भाजपची कडवी झुंज होणार बेकार, प. बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी सरकार; सर्व्हेचा अंदाज
By देवेश फडके | Published: January 19, 2021 10:39 AM2021-01-19T10:39:17+5:302021-01-19T10:42:18+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे, तर भाजप जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : आगामी वर्षात पश्चिम बंगालसह चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे, तर लोकसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याने भारतीय जनता पक्ष (भाजप) जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप कोणत्याही राज्याच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तरीही आतापासूनच जनतेचा कौल घेण्याकडे ओढा वाढत चालला आहे. सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला दोन टक्के आणि ५३ जागांचे नुकसान होऊ शकते. मागील निवडणुकीच्या तुलनेत टीएमसीला ४३ टक्के मते मिळतील. तर, १५८ जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपला ३७.५ टक्के मते मिळतील. तर, १०२ जागांवर विजय मिळवून भाजप तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मोठे नुकसान सोसावे लागू शकते. या आगामी निवडणुकीत काँग्रेसला ३० जागा मिळतील, असेही सर्व्हेत म्हटले आहे.
ममता बॅनर्जी सर्वाधिक पसंती असलेल्या मुख्यमंत्री उमेदवार म्हणून पुढे येतील. मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांना ४८.८ टक्के नागरिकांची पसंती दर्शवली आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष दुसऱ्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पश्चिम बंगालमधील ३७,१७ नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे.