Mamata Banerjee: 'गरज पडल्यास भीक मागेन, पण केंद्रासमोर...' CM ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:32 PM2023-04-13T19:32:29+5:302023-04-13T19:33:00+5:30
Mamata Banerjee : निधीच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींची टीका. काय म्हणाल्या, वाचा...
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निधीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकारविरोधात तीव्र वक्तव्य करताना त्या म्हणाल्या की, साडीचा पदर पसरुन राज्यातील महिलांकडे भीक मागेल, पण दिल्लीसमोर हात पसरणार नाही. यासोबतच पुढील वर्षी बंगालला केंद्राकडून निधी मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोलकाता येथे जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (13 एप्रिल) म्हटले की, "माझ्या मनात एकच गोष्ट येते की, लोकांनी माझ्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नये. केंद्राकडून आम्हाला कधी निधी दिला जातो तर कधी दिला जात नाही. आता आम्हाला 2024 पर्यंत काहीही दिले जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे. गरज पडली तर मी साडीचा पदस पसरून राज्यातील महिलांसमोर भीक मागेन, पण मी कधीच दिल्लीसमोर जाणार नाही.''
केंद्राकडून 7 हजार कोटी बाकी
29 मार्च रोजी ममता बॅनर्जी याच निधीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारच्या विरोधात दोन दिवसीय धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. 100 दिवसांच्या कामाच्या योजनेसह इतर योजनांसाठी राज्याला केंद्राकडून निधी मिळत नसल्याचा आरोप पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. तर, जीएसटीचा वाटाही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ममता सरकारचा आरोप आहे की, केंद्राकडे बंगालचे सात हजार कोटी रुपये येणे बाकी आहे.