ममता बॅनर्जी आज PM नरेंद्र मोदींना भेटणार, 'या' दोन मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 08:26 AM2021-11-24T08:26:56+5:302021-11-24T08:27:08+5:30
या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांची भेट घेणार नाहीत.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदिल्ली दौऱ्यावर असून त्या आज (24 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ममता बॅनर्जी यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ममता बॅनर्जी आणि पीएम मोदी यांची ही भेट संध्याकाळी 5 वाजता होईल.
ममता बॅनर्जी 'हे' मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीत ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दलाच्या(BSF) अधिकारक्षेत्रात वाढ आणि त्रिपुरामध्ये होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. यापूर्वी, ममता बॅनर्जींनी त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचारावरुन सरकारवर टीका केली होती. 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा कलम 355 आता कुठे आहे? भारत सरकारने त्रिपुराला किती नोटिसा पाठवल्या आहेत? त्यांना संविधानाची पर्वा नाही, जनतेची फसवणूक करणे एवढेच त्यांचे कर्तव्य आहे.'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत बीएसएफची कार्यकक्षा वाढवणे आणि त्रिपुरातील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जाईल. त्रिपुरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला आणि सयानी घोष या युवा नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ राजधानीत तृणमूल काँग्रेसच्या(TMC) खासदारांच्या धरणे आंदोलनात ती सामील होऊ शकणार नाही, परंतु नक्कीच त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभr राहीन, असं त्या म्हणाल्या होत्या.
ममता बॅनर्जी विरोधकांना एकत्र करण्यात गुंतल्या
तृणमूल काँग्रेस(TMC) च्या सूत्रांनी सांगितले की, दिल्ली दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी अनेक विरोधी नेत्यांना भेटतील आणि 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षावर(BJP)वर टीका करण्यसाठी रणनीती आखतील. संसदेत टीएमसीची रणनीती ठरवण्यासाठी ममता बॅनर्जी पक्षाच्या खासदारांसोबतही बैठक घेणार आहेत.
काँग्रेस नेत्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यावेळी सोनिया गांधींना भेटणार नाहीत. दरम्यान, काँग्रेस नेते कीर्ती आझाद, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक तंवर आणि जनता दल(युनायटेड)चे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. कीर्ती आझाद यांच्यासोबत त्यांची पत्नी पूनम आझाद आणि मुलगा यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.