ममतांनी साथ सोडली, नितीश कुमार गेले; ‘इंडिया’चे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:51 AM2024-01-31T06:51:52+5:302024-01-31T06:52:27+5:30
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली.
नवी दिल्ली - विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. २८ पक्ष असलेल्या ‘इंडिया’तील दोन प्रमुख पक्ष गेल्याने २६ घटक पक्ष राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. त्यामुळेच मोठ्या घटक पक्षांनी वेगळी भूमिका मांडल्याने ‘इंडिया’पुढील आव्हाने वाढली आहेत.
ममतांच्या स्वबळाच्या घोषणेचा कुणाला फायदा?
बंगालमधील लोकसभेच्या ४२ पैकी गतवेळी तृणमूलने २२, काँग्रेसने २, भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या.
यंदाच्या निवडणुकीत तृणमूल, काँग्रेस व डावे एकत्र आले असते, तर त्याचा फटका भाजपला बसला असता.
मात्र, तृणमूलने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.
कारण मागील निवडणुकीत भाजप २२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना यावेळी तृणमूल व काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो.
अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचा पेच
बंगाल व बिहारवगळता अन्य राज्यांमध्ये ‘इंडिया’पुढील जागावाटपाचा पेच कायम आहे. पंजाबमध्ये आपसोबत, यूपीमध्ये समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबत, महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनासोबत काँग्रेसला जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे.
नितीश कुमार एनडीएत गेल्याचा परिणाम काय?
- नितीश कुमार यांचा जदयु एनडीएत गेल्याने केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशात ‘इंडिया’ला फटका बसू शकतो.
- जदयुने गत निवडणुकीवेळी देशातील ७ राज्यांमध्ये उमेदवार उतरविले होते. केवळ बिहारमध्ये विजय मिळविता आला असला, तरी लक्षद्वीप, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू- काश्मीर, पंजाबमध्ये बरीच मते मिळविली होती.
- विशेषतः बिहार, यूपी व पंजाबमध्ये जदयुने भाजप उमेदवारांचे नुकसान केले होते; परंतु आता त्यांना फायदा होणार आहे.