President Election: राष्ट्रपती निवडणुकीवर होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच ममता बॅनर्जींना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:21 PM2022-06-15T12:21:55+5:302022-06-15T12:22:27+5:30
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून, २१ जुलै रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत.
नवी दिल्ली - येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. विरोधकांना एकजूट करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन केले आहे. दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ममता यांनी २२ प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून निमंत्रण दिले होते. परंतु ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
दिल्लीत विरोधकांच्या बैठकीला आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्रीय समितीसारख्या पक्षांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. याआधी या पक्षाचे प्रतिनिधी बैठकीला जाणार अशी माहिती देण्यात आली होती. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत बैठकीचं आयोजन केले. या बैठकीसाठी बॅनर्जींकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीताराम येंचुरी, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले.
आता विरोधकांच्या या बैठकीला काही नेते दांडी मारणार आहेत. सीपीआयएम नेते सीताराम येंचुरी यांनी ममता बॅनर्जींचं हे पाऊल विरोधकांच्या ऐक्यासाठी योग्य नाही असं म्हटलं होतं. आता आम आदमी पार्टी, टीआरएसनेही बैठकीपासून अंतर ठेवले आहे. टीआरएसनं सांगितले की, ज्या व्यासपीठावर काँग्रेस असेल त्यावर आम्ही उभं राहणार नाही. सूत्रांनुसार, आपने सांगितले की, राष्ट्रपती उमेदवार घोषित झाल्यानंतर आम आदमी पक्ष त्यावर विचार करेल. समाजवादी पक्षाकडून ममता बॅनर्जींच्या बैठकीला अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून, २१ जुलै रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नाव होते, पण त्यांनी आधीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसने पवार यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या आठवड्यात सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, आता पवारांकडूनच यास नकार देण्यात आला आहे.