प. बंगालमध्ये पुन्हा खेला होबे! ममता दीदींची जादू कायम; महापालिका निवडणुकीत TMC ची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 08:48 PM2022-02-14T20:48:30+5:302022-02-14T20:50:26+5:30
पश्चिम बंगालमधील स्थानिक निवडणुकांमध्ये तृणमूलने काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांना चितपट केलेय.
कोलकाता:पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपलेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहेत. पश्चिम बंगालमधील चार निवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांना चितपट करत तृणमूल काँग्रेसने दणदणीत बाजी मारली आहे. या महानगरपालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चारही महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत.
या चारही महापालिकांसाठी १२ फेब्रुवारी रोजी निवडणुकांचे मतदान पार पडले. यानंतर आता या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. निवडणूक पूर्व अंदाजातही तृणमूल काँग्रेसचे पारडे जड असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्याप्रमाणे ममता दीदींच्या टीएमसीने भाजप, काँग्रेस, डाव्या पक्षांसह सर्वांना धोबीपछाड देत आपलीच हवा असल्याचे दाखवून दिले आहे.
विधाननगरमध्ये तृणमूलने ४१ पैकी ३९ जागा जिंकल्या
विधाननगरमध्ये तृणमूलने ४१ पैकी ३९ जागा जिंकल्या तर उर्वरित दोन जागी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. माजी महापौर सब्यासाची दत्ता यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र २०२१ विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांनी तृणमूलच्या तिकीटावर चंदननगरमधून निवडणूक जिंकली. तृणमूलने ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या, तर एक जागी सीपीआयएमला मिळाली. असनसोल येथील १०६ जागांपैकी तृणमूलने ९१ तर भाजपाने सात जागा जिंकल्या. सीपीआयएमला दोन तर काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. सिलिगुडीमध्ये तृणमूलने ३७ तर भाजपाने पाच जागांवर विजय मिळवला. सीपीआयएमला चार तर काँग्रेसला एक जागा मिळाली.
हा जबरदस्त विजय आहे
हा जबरदस्त विजय आहे. महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांवर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोलमधील लोकांचे आभार मानते. आमची विकासकामे अधिक जोमाने आणि उत्साहाने पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी मनापासून आभारी आहे, असे ट्विट करत ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.