ममता बॅनर्जींचे केंद्राविरुद्ध बंड! सीबीआय व राज्य पोलिसांत संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:31 AM2019-02-04T07:31:48+5:302019-02-04T09:46:29+5:30
पश्चिम बंगालमध्ये रविवारी ‘सीबीआय’ विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये उघड संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडाचे निशाण फडकावत केंद्र सरकारच्या राजकीय दादागिरीविरुद्ध कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात धरणे सुरू केले.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये रविवारी ‘सीबीआय’ विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये उघड संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडाचे निशाण फडकावत केंद्र सरकारच्या राजकीय दादागिरीविरुद्ध कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात धरणे सुरू केले.
काही वर्षांपूर्वी झालेल्या शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जबाब नोंदविण्यासाठी आलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांच्या पथकाला आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरच रोखण्यात आले. स्थानिक पोलिसांनी या पथकातील अधिका-यांना शेजारच्या पोलीस ठाण्यात नेऊन अडकवून ठेवले.
या अधिका-यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने तणाव कमालीचा वाढला. सीबीआयच्या कोलकातामधील कार्यालयास स्थानिक पोलिसांनी वेढा घातल्यानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय राखीव पोलीस दलाने तेथून त्यांना पिटाळून लावत इमारतीचा ताबा घेतला.
हे नाट्य सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही जातीने पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबेहर पोहोचल्या. त्या पोलीस आयुक्तांच्या ठामपणे पाठीशी उभा राहिल्या. एवढेच नव्हे, तर केंद्र सरकार राजकीय द्वेशाने विरोधी पक्षांची सरकारे खिळखिळी करण्यासाठी तपासी यंत्रणांचा हस्तक म्हणून वापर करत असल्याचा आरोप करून, त्यांनी पंतप्रधान मोदी व भाजपावर हल्लाबोल केला. राज्यातील एकाही प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ला करू देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यातून केंद्र आणि राज्यातील उघड राजकीय संघर्षाचे चित्र पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर दिसले.
या चीट फंड घोटाळ्यांचा तपास ‘सीबीआय’कडे जाण्यापूर्वी आता पोलीस आयुक्त झालेले राजीव कुमार त्या प्रकरणांचे तपासी अधिकारी होते. त्या तपासातील काही महत्त्वाच्या फायली व कागदपत्रे गहाळ झाल्याचे ‘सीबीआय’चे म्हणणे आहे. त्यासंबंधी जाबजबाब घेण्यासाठी यापूर्वी नोटीस पाठवून ते हजर न राहिल्याने, ‘सीबीआय’च्या सुमारे ४० अधिका-यांचे पथक रविवारी त्यांच्या निवासस्थानी हजर झाले. ‘सीबीआय’ अधिकारी येत आहेत हे कळताच, ममता बॅनर्जी यांनी ‘केंद्राची राजकीय दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही,’ असे ट्विट करून पोलीस आयुक्तांना ठाम पाठिंबा दिला होता. माझे आयुक्त जगातील सर्वोत्तम आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.
मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे पडली वादाची ठिणगी? https://t.co/VkLgelIXmb#MamataVsCBI#MamataBlocksCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019
दिवसभरात पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेरील नाट्य रंगत गेले व गर्दी वाढत गेली. सुरुवातीस बंगल्याच्या गेटवरील पहारेकºयांनी ‘सीबीआय’ पथकाला बाहेरच थांबविले. थोड्या वेळाने काही स्थानिक पोलिसांनी येऊन या पथकाशी हुज्जत घातली. त्यांच्यात थोडी झटापटही झाली. त्यानंतर आणखी काही स्थानिक पोलीस आले व ते या पथकातील अधिकाºयांना जबरदस्तीने ओढत जवळच्या शेक्सपीयर सारणी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. हे वृत्त देईपर्यंत सीबीआयचे पथक पोलीस ठाण्यातून बाहेर आलेले नव्हते व ममता बॅनर्जी यांनी धरणे सुरु केले होते. थोड्या वेळाने पोलीस आयुक्त कुमार हेही धरण्यावर बसले. गेल्या महिन्यात कोलकत्यातील सभेत एकत्र आलेल्या अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टिष्ट्वट करून किंवा फोन करून ममतांना पाठिंबा दिला. रात्रीपर्यंत या संघर्षास केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध देशभरातील विरोधी पक्षांची एकजूट असे स्वरूप येताना दिसत होते. कदाचित सोमवारी इतरही विरोधी पक्षनेते कोलकत्यात पोहोचून या संघर्षात सक्रियतेने सामील होतील, अशी चिन्हे आहेत. रात्री उशिरा संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव’, ‘मोदी की दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत धरणे आणि निदर्शने सुरु केली होती. अनेक ठिकाणी रेलरोको झाल्याचेही वृत्त होते.
रात्री उशिरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मोदी, अमित शहा व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल बंगालमधील लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केला. भाजपाने मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तपासासाठी आलेल्या सीबीआयला रोखून ममता राजकीय लाभ मिळविण्याचे स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप केला.
शारदा घोटाळ्यामुळे मोदी-ममतांमध्ये तेढ; जाणून घ्या प्रकरणाबद्दल ए टू झेड https://t.co/943LonTcYM#MamataVsCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019
सीबीआय अधिकारी आयुक्तांच्या घरी वॉरंट
न काढताच आले होते. ही कारवाई म्हणजे देशाच्या संघीय रचना मोडून काढण्याचा प्रकार आहे. देशाच्या संघ प्रणालीचे रक्षण करण्यासाठी मी आजपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. - ममता बॅनर्जी
आदित्यनाथांचे हेलिकॉप्टर परतवले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बंगालमध्ये रविवारी एक जाहीर सभा होणार होती, परंतु त्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले गेले नाही. नंतर आदित्यनाथ यांनी सभेला फोनवरून संबोधित केले व कायदा आणि राज्यघटना पायदळी तुडविणाºया ममता सरकारचे दिवस भरले असल्याचे जाहीर केले.
मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे पडली वादाची ठिणगी? https://t.co/VkLgelIXmb#MamataVsCBI#MamataBlocksCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019