'आमचे पैसे द्या, नाहीतर सत्ता सोडा', केंद्रातील मोदी सरकारवर ममता बॅनर्जी भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:09 PM2022-11-15T17:09:05+5:302022-11-15T17:09:53+5:30
'विकास निधी मिळवण्यासाठी मोदींच्या पाया पडून भीक मागावी लागेल का?'
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज बिरसा मुंडा जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सीएम ममता यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. विकास निधी मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) पाया पडून भीक मागावी लागेल का, असे त्या म्हणाल्या.
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee tries her hand on drums and joins artists performing traditional dance in Jhargram pic.twitter.com/j8MeN5X8zq
— ANI (@ANI) November 15, 2022
मनरेगाचा निधी दिला जात नसल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी यावेळी केला. केंद्र सरकारने त्यांचे पैसे द्यावे नाहीतर सरकार सोडावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बंगालच्या झारग्राम जिल्ह्यात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री ममता यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आदिवासी समाजातील लोकांना संबोधित केले. ममता बॅनर्जीही येथे पारंपारिक ढोल वाजवताना दिसल्या.
ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर निशाणा
कार्यक्रमात सीएम ममता म्हणाल्या की, आदिवासींची जमीन कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे आम्ही म्हटले होते. आम्ही हे होऊ दिले नाही. काही लोक दिल्लीला (केंद्र सरकार) लिहितात की बंगाल सरकारला विकासासाठी निधी देऊ नये. असेच चालू राहिल्यास केंद्र सरकारच्या अत्याचाराला ढोल, बाण, धनुष्यबाण घेऊन विरोध करा, असे मी सांगेन. तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तर लोक तुम्हाला जीएसटी का देतील? असा सवालही त्यांनी यावेळी केला.