'बांग्लादेशी नागरिकांसाठी आमचे दरवाजे खुले, त्यांना आश्रय देणार', ममता बॅनर्जींचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 05:53 PM2024-07-21T17:53:52+5:302024-07-21T17:54:33+5:30

Bangladesh Violence : आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Mamata Banerjee: 'We will give shelter to Bangladeshi citizens', Mamata Banerjee's big statement | 'बांग्लादेशी नागरिकांसाठी आमचे दरवाजे खुले, त्यांना आश्रय देणार', ममता बॅनर्जींचे मोठे वक्तव्य

'बांग्लादेशी नागरिकांसाठी आमचे दरवाजे खुले, त्यांना आश्रय देणार', ममता बॅनर्जींचे मोठे वक्तव्य

Mamata Banerjee on Bangladesh : बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रविवारी(दि.21) कोलकाता येथे शहीद दिनाच्या रॅलीनिमित्त व्हिक्टोरिया हाऊससमोर आयोजित सभेला संबोधित करताना ममता यांनी बांगलादेशातील जनतेला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे दरवाजे बांग्लादेशी आश्रितांसाठी नेहमी खुले असतील, असेही त्या म्हणाल्या. 

निर्वासितांबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मी बांगलादेशबद्दल फार बोलू शकत नाही, कारण तो वेगळा देश आहे. यावर बोलण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. पण मी एवढे सांगू शकते की, बांग्लादेशमधील पीडितांनी पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर मी नक्की मदत करेन आणि त्यांना आमच्या राज्यात आश्रय देईन. ज्यांचे नातेवाईक हिंसाचारग्रस्त बांगलादेशात अडकले आहेत, अशा सर्व बंगालमधील रहिवाशांसाठी आम्ही मदत करू. मी सर्वांना आवाहन करते की, बांगलादेशाबाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नये. फक्त बंगालच भारताचे अस्तित्व सुरक्षित करू शकतो, बंगालशिवाय भारत नाही." 

भाषणादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपवर आरोप करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजपने लोकांना धमकावून आणि एजन्सीचा गैरवापर करून केंद्रात सरकार स्थापन केले आहे. अनेक लढाया लढल्या गेल्या आहेत आणि अजून बऱ्याच लढायच्या आहेत. मी जिवंत असेपर्यंत लढेन," असेही ममता यावेळी म्हणाल्या.  

बांग्लादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
दरम्यान, अनेक दिवसांच्या हिंसाचारानंतर आज बांग्लादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, आतापासून सरकारी नोकऱ्यांमध्ये 93 टक्के भरती गुणवत्तेच्या आधारे केली जाईल आणि उर्वरित 7 टक्के जागाच राखीव असतील. 

Web Title: Mamata Banerjee: 'We will give shelter to Bangladeshi citizens', Mamata Banerjee's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.