दुर्गापूजा समित्यांना ८५ हजार रुपये अनुदान, वीज शुल्कात ७५ टक्के सूट… ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:19 PM2024-07-23T18:19:12+5:302024-07-23T18:19:55+5:30
Mamata Banerjee : गेल्या वर्षी पूजा समित्यांना ७० हजार रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं. यावेळी त्यात १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये दुर्गा पूजा समित्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पूजा समित्यांसह अनेक धार्मिक व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी यावर्षी पूजा समित्यांना ८५ हजार अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच वीज शुल्कात ७५ टक्के सूट दिली. तसेच अग्निशमन परवान्यासह इतर शुल्कात सूट जाहीर केली.
दरम्यान, गेल्या वर्षी पूजा समित्यांना ७० हजार रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं. यावेळी त्यात १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पुढील वर्षी एक लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल. तसंच, १५ ऑक्टोबर रोजी पूजा कार्निव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा मूर्तींचं विसर्जन होणार आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोलकाता तसंच जिल्ह्यांमध्ये पूजा आयोजित केली जात आहे. संपूर्ण राज्यात जवळपास ४२ हजार पूजांचे आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या पूजा मंडपात पोलिस बंदोबस्त असतो, मात्र स्वयंसेवी संस्थांनीही पुढे यायला हवं, असं त्यांनी सांगितलं. तसंच, या कार्यक्रमात महिला व विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचं आवाहनही ममता बॅनर्जी यांनी केलं.
पुढं ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी व्हीआयपी कार्डच्या विरोधात आहे. व्हीआयपींना जास्त सुविधा मिळतील, असे होऊ नये. सर्वसामान्य जनता वंचित राहू नये. एवढ्या गर्दीत व्हीआयपींची हालचाल पाहून सर्वसामान्यांना त्रास होतो. तसंच, तुम्ही कोणतीही थीम तयार केली तर ती पोलिसांसोबत शेअर करा. कारण अशा परिस्थितीत चेंगराचेंगरी होऊ शकते. तसंच, लाइटमुळं हवाई सेवा विस्कळीत होऊ शकते. याकडं लक्ष देण्याची गरज आहे, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
याचबरोबर, पूजेबाबत समन्वय आवश्यक आहे. पोलीस नियंत्रण कक्ष, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष व पूजा नियंत्रण कक्ष यांनी परस्पर समन्वयानं काम करावं. पूजेच्या वेळी हेल्पलाइन कार्यरत राहावी, याची व्यवस्था करावी लागेल. महिलांना कोणतीही अडचण नसून ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींना कोणतीही अडचण येऊ नये, याकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था करा, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.