Mamata Banerjee : '2024 च्या निवडणुकीत मोदी विरुद्ध अख्खा देश, अच्छे दिन पाहिले, आता 'सच्चे दिन'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 08:43 PM2021-07-28T20:43:03+5:302021-07-28T20:45:28+5:30
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प. बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता, 'संपूर्ण देशात खेला होबे होणार, आणि 2024 ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी होईल' असा दावाच ममता यांनी केला.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यात आज तिसऱ्या दिवशी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. सध्या देशभरात विरोधी पक्षांच्या एकजुटीवर चर्चा सुरू असतानाच ममतांनी ही भेट घेतली आहे. तसेच, पेगासीस, कृषी कायदे आणि महागाईच्या मुद्द्यांवर संसद ठप्प आहे. अशातच झालेल्या या भेटीला अत्यंत महत्व आहे. ममता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प. बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता, 'संपूर्ण देशात खेला होबे होणार, आणि 2024 ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी होईल' असा दावाच ममता यांनी केला आहे. त्यासोबतच, आता देशवासीयांना सच्चे दिन' पाहायचे आहेत, हे अच्छे दिन खूप बघितले, असा टोलाही लगावला. तुम्ही विरोधी पक्षाचं नेतृत्व करणार का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला होता. त्यावर, 'मी राजकीय ज्योतिषी नाही, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. मी कोलकात्यातच ठीक, पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना मदत करणार', असे उत्तर बॅनर्जी यांनी दिलं.
Delhi | I am not a political astrologer, it depends on the situation. Today I have a meeting with Sonia Ji and Arvind Kejriwal. After Parliament session, Opposition parties must meet: West Bengal CM Mamata Banerjee, on being asked if she will be the face of Opposition pic.twitter.com/k62N7hdldQ
— ANI (@ANI) July 28, 2021
दरम्यान, नरेंद्र मोदींकडे बघून मला हिंदी जमायला लागलं आणि अमित शाहांकडे कडे बघून गुजराती, असा मिश्कील टोलाही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना लगावला.
सोनिया गांधीसोबत चर्चा
सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, सोनिया गांधींसोबतची भेट अत्यंत सकारात्मक झाली. विरोधी पक्षांची एकी, पेगासीस आणि सध्याची राजकीय परिस्थिती यांवर चर्चा झाली. भाजपला हरविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. पेगासीस मुद्द्यावर ममता म्हणाल्या, यावर सरकार उत्तर का देत नाही. सरकारने संसदेत उत्तर द्यावे. ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या.