"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:58 PM2024-10-26T15:58:18+5:302024-10-26T15:59:30+5:30
Mamata Banerjee : पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे आवाहन देखिल ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
Mamata Banerjee: आगामी सणासुदीच्या काळात काही समाजकंटक अशांतता निर्माण करण्याचा कट रचत आहेत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, दिवाळी, काली पूजा आणि छठ पूजा किंवा सणांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट रचला जात आहे. तसेच, पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे आवाहन देखिल ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून ममता बॅनर्जी यांनी राज्य पोलिसांना कार्यक्रमादरम्यान असे कोणतेही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी दक्षता वाढविण्याचे आवाहन केले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काली पूजा लवकरच येत आहे. पोलीस आणि विशेष टास्क फोर्सने गुप्तचर माहिती गोळा करावी आणि राज्यात कोणताही स्फोट होणार नाही, याची खात्री करावी. बंगालमध्ये जातीय दंगली भडकवण्याचा आणि हिंसाचार घडवण्याचा कट रचला जात आहे, जो थांबवला पाहिजे."
यावर्षी काली पूजा ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवाळीच्याच दिवशी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सावध केले की, काही गट सणासुदीच्या काळात विशेषतः कोलकातामध्ये धार्मिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्या म्हणाल्या, "मला बंगालमध्ये जातीय तणाव नको आहे. कोणत्याही भडकावणाऱ्यावर पोलीस कठोर कारवाई करतील, पण मी मीडियाला विनंती करते की, हे सनसनाटी निर्माण करू नका... कृपया जनतेला भडकावणे टाळा."
दरम्यान, बंगालमध्ये दाना चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. बंगालमधील अनेक जिल्ह्यांना या वादळाचा फटका बसला आहे. या भागातील परिस्थितीचा आढावा ममता बॅनर्जी यांनी घेतला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये दाना चक्रीवादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली, तर सखल भागातून जवळपास दोन लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.