विरोधकांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी घालणार बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:00 AM2020-01-10T05:00:17+5:302020-01-10T05:00:48+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १३ जानेवारी रोजी दिल्लीत आयोजिलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहिष्कार घालणार आहेत.
कोलकाता : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ विविध विद्यापीठांत होत असलेली हिंसक निदर्शने व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १३ जानेवारी रोजी दिल्लीत आयोजिलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहिष्कार घालणार आहेत.
कामगार संघटनांनी बुधवारी आयोजिलेल्या भारत बंददरम्यान पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी रेल, रास्ता रोको आंदोलन झाले. हिंसक घटनाही घडल्या. हे प्रकार बंदला समर्थन देणाऱ्या डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केले असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. डावे पक्ष व काँग्रेसने घेतलेली दुतोंडीपणाची भूमिका आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या आयोजिलेल्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केले. (वृत्तसंस्था)
>विसंगत राजकारण
डावे व काँग्रेस यांची शक्ती पश्चिम बंगालमध्ये क्षीण झाली आहे. ममता बॅनर्जी राज्याच्या राजकारणात भाजप, काँग्रेस, डाव्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या दिसतात, तर राष्ट्रीय राजकारणात भाजपला विरोध करण्यासाठी त्या काँग्रेससोबतही जाताना दिसतात. त्यांच्या राजकारणात विसंगती आहेत.