ED ची छापेमारी, NCERT च्या प्रस्तावावर ममता भडकल्या; थेट मोहम्मद बिन तुघलकाशी केली भाजपची तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:42 PM2023-10-26T17:42:39+5:302023-10-26T17:43:31+5:30
ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले आहे. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर छापेमारीही केली आहे. याच बरोबर ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या छापेमारीवरून त्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला. याच वेळी, देशात निवडणुकीचा घाणेरडा खेळ खेळला जात आहे. तसेच, भाजप मुहम्मद बिन तुघलकाप्रमाणे इतिहास बदलू इच्छित असल्याचेही ममतांनी म्हटले आहे.
ईडीची छापेमारी -
ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले आहे. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर छापेमारीही केली आहे. याच बरोबर ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई केली आहे.
ममता बॅनर्जी गुरुवाकरी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, 'काय अत्याचार, काय अनाचार सुरू आहे? भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी, संपूर्ण देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या छापेमारीच्या नावाखाली घाणेरडा खेळ खेळत आहे. एवढेच नाही, तर भाजपच्या एखाद्या नेत्याच्या घरावर ईडीने छापेमारी केली का? असा सवालही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करायची धमकी -
पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या ठिकाणांवरील ईडीच्या छापेमारीसंदर्भात, ममतांनी ईडीवर गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्योतिप्रिय यांची प्रकृती बरी नाही. ईडीच्या छापेमारीदरम्यान त्यांना काही झाले, तर मी गुन्हा दाखल करेन. एवढेच नाही, भाजपला 'सबका साथ सबका विकास' हवा आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात याचा अर्थ 'सबका साथ सबका विनाश' असा आहे, असेही ममता म्हणाल्या.
NCERT वरही निशाणा -
शाळेच्या अभ्यासक्रमात 'इंडिया' एवजी 'भारत', असा बदल करण्याच्या मुद्द्यावरूनही मामता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला. ममता म्हणाल्या, भाजप मुहम्मद बिन तुघलकाप्रमाणे इतिहास बदलू इच्छित आहे. यावेळी त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीचाही उल्लेख केला.