"सर्वांचे केंद्र केवळ दिल्लीच का, देशाला चार राजधान्या हव्यात"; ममता बॅनर्जींची मागणी
By देवेश फडके | Published: January 23, 2021 03:34 PM2021-01-23T15:34:44+5:302021-01-23T15:36:20+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोलकातामधील श्याम बाजार येथे एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शंखनाद करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारतात किमान चार रोटेटिंग राजधान्या असायला हव्यात. इंग्रजांनी कोलकाता येथे बसून संपूर्ण देशावर राज्य केले. देशात एकच राजधानी का आहे?, असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थित केला.
I believe that India must have 4 rotating capitals. The English ruled the entire country from Kolkata. Why should there be only one capital city in our country: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/ifOoFXah9g
— ANI (@ANI) January 23, 2021
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. त्यावेळी त्यात गुजरात, बंगाल, तामिळनाडू या भागातील लोकांनीही सहभाग घेतला. फोडा आणि राज्य करा, याचा नेताजी नेहमी विरोध करायचे. बंगलाच्या भावना बाहेरील व्यक्ती समजून घेऊ शकत नाही, असे सांगत भारतीय जनता पक्ष (भाजप) इतिहास बदलण्याचा विचार करत आहे. नेता तोच असतो, जो सर्वांना सोबत घेऊन जातो, असे मत ममता बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केले.
नवीन पीढीला नेताजींबाबत अधिक माहिती नाही. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले गेले पाहिजे. नेताजी आमच्यासाठी देशनायक आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपला पश्चिम बंगालची आठवण झाली, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.