ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:29 PM2024-04-17T16:29:03+5:302024-04-17T16:29:23+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या दोन दिवस आधीच टीएमसीने जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला आहे. यामध्ये केंद्रात सरकार बनले तर सीएए कायदा रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच एनआरसीची प्रक्रिया देखील रोखण्यात येणार असल्याचे ममतांनी जाहीर केले आहे.
तृणमूल काँग्रेसने घोषणापत्रात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या दोन दिवस आधीच टीएमसीने जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान कुचबिहार, अलीपुरद्वार आणि लपाईगुडीमध्ये होणार आहे. डरेक ओब्रायन यांनी सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये आमचे सरकार बनल्यास मनरेगाचे मानधन ४०० रुपये प्रति दिन करण्यात येणार आहे. सर्वांसाठी पक्की घरे बनविली जाणार आहेत. बीपीएल कार्डधारकांना वर्षाला १० गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला महिन्याला १००० रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
सर्व नागरिकांना १० लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. उच्च शिक्षित विद्यार्थ्याला १० लाख रुपयांपर्यंतचा स्टुडंट क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाईल. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना तिप्पट शिष्यवृत्ती दिली जाईल, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.