ममता बॅनर्जी यांच्या हत्येसाठी ६५ लाख रुपयांची सुपारी? विद्यार्थ्याला मेसेज, पोलिसांनी केला तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:07 AM2017-10-19T04:07:53+5:302017-10-19T04:08:22+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी आपणास देऊ केली होती, असा धक्कादायक दावा १९ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने केल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी आपणास देऊ केली होती, असा धक्कादायक दावा १९ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने केल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आपणास सोमवारी व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी एक लाख डॉलर्स (सुमारे 65 लाख रुपये) ची आॅफर देण्यात आली होती, असे मुर्शिदाबादमधील बेहरामपूर येथे राहणाºया विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले आहे. ज्या मोबाइल नंबरवरून हा मेसेज आला, तो अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
त्या विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मला पहिला मेसेज आला. आपण स्वत: लॅटिन असल्याचे सांगत होता. आपण एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असून, भारतामध्ये जोडीदाराचा शोध घेत आहोत, असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. तुला या कामाासाठी १ लाख डॉलर्स देण्यात येतील. तू पूर्णत: सुरक्षिात राहशील. त्याची जबाबदारी आम्ही घेऊ , तू काळजी करु नकोस. तू तयार आहेस का, एवढे मात्र कळव असेही मेसेजमध्ये लिहिले होते.
दुसºयांदा पुन्हा सुमारे पावणेतीनच्या सुमारात पुन्हा मेसेच आला. तू पराभवी मनोवृत्तीचा आहेस, असा तेव्हाच्या मेसेजमध्ये होेत. नंतर साडेतीन वाजता पुन्हा मेसेज आला. त्यात संबंधित इसमाने आपण भारतात येण्याची योजना आखत असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर या विद्यार्थ्याने आपल्या देशावर आपले प्रेम आहे. त्याचा नाश आपण पाहू शकत नाही, असे उत्तर दिले. पण आम्हाला भारताचा नाश करायचा नसून, केवळ एका व्यक्तीला संपवायचे आहे, असे संबंधित इसमाने कळवले.
फोन बंद ठेवण्याचा सल्ला
या प्रकारानंतर मी पोलीस ठाण्यात जाण्याचा आणि या प्रकाराची माहिती देण्याचा निर्णय घेतला. मी पोलीस ठाण्यात जात असताना पुन्हा मला एक मेसेज आला. त्यात तू पोलीस ठाण्याकडे निघाला आहेस, असे तुझे लोकेशन मला दिसत आहे. तुझ्यावर आमची नजर आहे. आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस, अन्यथा तुझीही हत्या केली जाईल, असा मेसेज मला आला, असे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला त्याचा मोबाइल फोन बंद करण्याचा सल्ला दिला आहे. कोलकाता पोलिसांनी हा तपास सीआयडीकडे सोपविला आहे.