Vice Presidential Election 2022: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधी विरोधकांना धक्का; ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:16 PM2022-07-21T19:16:17+5:302022-07-21T19:17:33+5:30
शरद पवार यांनी केली होती विरोधकांच्या संयुक्त उमेदवाराची घोषणा
Vice Presidential Election 2022: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ( Mamta Bannerjee ) या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैचारिक विरोधक मानल्या जातात. TMC कडून मोदींच्या धोरणांवर सातत्याने टीका केली जाते. मात्र तृणमूल काँग्रेसने आज घेतलेला एक निर्णय भाजपाप्रणित NDA च्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आपला पक्ष एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड ( Jagdeep Dhankhar ) यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले. यासोबतच टीएमसीनेही पक्ष आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा ( Margaret Alva ) यांचे नाव अंतिम करण्याआधी विरोधकांनी 'टीएमसी'शी चर्चा केली नसल्याचे पक्षाचे मत आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
TMC will not support NDA's Vice-Presidential candidate Jagdeep Dhankhar. The party will abstain from the upcoming Vice Presidential polls as it was decided in the meeting: TMC MP Abhishek Banerjee
— ANI (@ANI) July 21, 2022
(File pic) pic.twitter.com/gf12NiuhME
तृणमूलचे खासदार म्हणाले की, एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण दोन्ही सभागृहात ३५ खासदार असलेल्या पक्षाशी चर्चा न करता आणि विचार-विनिमय न करता विरोधी उमेदवार ज्या पद्धतीने ठरवण्यात आला. त्यामुळेच मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या वैचारिक मतभेदामुळे विरोधकांची एकजूट कमकुवत होणार नाही. कोणताही विरोधी पक्ष- आप, द्रमुक, त्यांना काहीही चर्चा करायची असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या चर्चेला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी केली होती नावाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १७ विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांची उपराष्ट्रपती पदाची संयुक्त उमेदवार म्हणून घोषणा केली होती. यानंतर TMCने २१ जुलै रोजी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली असताना एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्टला पार पडणार आहे.